कारखानदारीला समर्थपणे हाताळणारी पिढी घडवली पाहिजे !

गप्पांमध्ये रंगलेले शरद पवार आणि मनोहर जोशी
गप्पांमध्ये रंगलेले शरद पवार आणि मनोहर जोशी
Updated on

नवी मुंबई : राज्यभरात शिक्षणाचा विस्तार आणि सार्वत्रिकीकरण झाले आहे; मात्र सार्वत्रिकीकरणापेक्षा यात सहभागी असलेल्या शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता वाढीस लागणे ही सध्याची गरज आहे. कारखानदारीला समर्थपणे हाताळणारी पिढी घडवली पाहिजे, असे प्रतिपादन माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. पनवेल येथे कोकण एज्युकेशन संस्थेच्या व्ही. के हायस्कूलच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते.

याप्रसंगी पवार यांनी शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या आठवणींना उजाळा दिला. राज्यभरात शिक्षणाचा प्रसार करताना अनेक शिक्षण संस्थांनी महाराष्ट्रातील पिढ्यान्‌ पिढ्या घडवल्या आहेत, कर्तृत्ववान लोक तयार केले आहेत. यात प्रामुख्याने कोकण एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेचा उल्लेख करावा लागतो असे पवार बोलले, परंतु अलीकडच्या काळात जिल्ह्यात जी स्थित्यंतरे झाली आहेत, ही झालेली स्थित्यंतरे पाहता शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाने दिशा बदलली आहे, असे मत पवार यांनी व्यक्त केले. एखादी शैक्षणिक संस्था उभारणे आणि ती अविरतपणे चालवणे अवघड बाब असताना ती टिकून ठेवणे ही तारेवरची कसरत असल्याचे पवारांनी सांगितले.

खेड्यापाड्यांतील लोकांनी शेती करावी, मत्स्यव्यवसाय करावा; मात्र हे सगळं करण्यासाठीसुद्धा शिक्षण महत्त्वाचे असल्याचा पुनरुच्चार पवारांनी केला. या वेळी शाळेच्या देखभालीत योगदान देणाऱ्या सर्वच मंडळींसोबत काम करण्याचे आपल्याला भाग्य लाभले. हे सांगताना पवार यांनी माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या योगदानाचा आवर्जून उल्लेख केला.

मनोहर जोशींकडून आठवणींना उजाळा
याप्रसंगी उपस्थित माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी आपल्या शाळकरी जीवनातील व्ही. के. हायस्कूलच्या आठवणींना उजाळा दिला. तुम्ही कुठेही गेलात तरी शाळेला विसरू नका, असा आपुलकीचा सल्ला जोशी यांनी उपस्थितांना दिला. आपल्या खडतर जीवनात शिक्षकांचे वेळेवर मिळालेले मार्गदर्शन व प्रेमामुळे आपण यशस्वी झाल्याचे सांगत जोशी यांनी पनवेलमधील जुन्या आठवणी सांगितल्या. या कार्यक्रमात पनवेलमधील माजी शिक्षक, विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय पाटील, खासदार सुनील तटकरे, शाळेचे चेअरमन तथा कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी आमदार विवेक पाटील उपस्थित होते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.