प्रेयसीला भेटण्यास बोलावून मारहाण करत कारखाली चिरडल्याची धक्कादायक घटना मुंबईशेजारच्या ठाण्यात घडली आहे. पीडित तरुणीनं सोशल मीडियावर याविषयी पोस्ट टाकली असून त्यात तिनं प्रियकर अश्वजीत गायकवाड, त्याचा मित्र रोमिल पाटील आणि कारचालक सागर शेळके यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत.
आरोप करताना पीडितेनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय,
सोमवारी पहाटे ४ वाजता प्रियकर अश्वजीत गायकवाडचा कॉल आला. त्यानं एके ठिकाणी आपल्याला भेटायला बोलावलं. तो तिथे त्याच्या कुटुंबीयांसमवेत आणि मित्रांसोबत होता. तिथे भेटण्यासाठी पोहचले असता, माझा प्रियकर विचित्र वागताना दिसला. तेव्हा मी त्याला खासगीत चर्चा करण्यासाठी विचारलं. त्यावेळी त्याचा मित्र रोमिल पाटीलनं मात्र ते होऊ दिलं नाही, याउलट तो माझा अपमान करत राहिला. त्याचं पुढे वादात रुपांतर झालं. यावेळी प्रियकर आणि त्याच्या मित्रानं शिवराळ भाषा वापरली, त्यावेळी मी प्रियकराला मला डिफेन्ड करायला सांगितलं असता त्यानं कधीही विचार केला नव्हता असं कृत्य केलं.
ते म्हणजे त्यानं माझ्यावर हात उगारला, गळा धरला, केस ओढले अन् हाताला चावा घेऊन मला दूर ढकललं. त्यानंतर त्याच्या मित्रानंही मला जमिनीवर पाडलं. मला काही कळेपर्यंत ते दोघेही कारच्या दिशेनं निघून गेले. या संपूर्ण घटनेत त्यानं माझा फोन, बॅग हिसकावून घेतली होती. ती घेण्यासाठी मी कारच्या दिशेनं धावत गेली. कारजवळ पोहचताच त्यानं ड्रायव्हर सागरला ‘उडा दे इसको’ असं म्हटलं. त्यानंतर त्याच्या चालकानंही वेगानं कार माझ्या अंगावर घातली आणि गाडीचं डावं चाक माझ्या उजव्या पायावरुन गेलं. त्यानंतर मी दुखण्यातून विव्हळत होते, मदतीसाठी याचना करत होते.
पण त्यांनी तिथून पळ काढला अन् जवळपास अर्धा तास मी रस्त्यावर तशीच पडून होते. त्यानंतर एका व्यक्तीला मी दिसले आणि त्यानं स्थानिक पोलिसांना कळवलं. तोपर्यत प्रियकराचा चालक पुन्हा तिथे आला आणि त्यानं खातरजमा केली की मी मेले आहे की जिवंत आहे. त्यानंतर एक अनोळखी व्यक्ती माझी मदत करतोय हे पाहून सागर या चालकानं पोलिसांपर्यंत हे प्रकरण जाऊ नये, याकरिता मला रुग्णालयात नेलं. गाडीतून रुग्णालयात जाईपर्यंत त्याचा चालक मला हेच सांगत होता की, या प्रकरणात पोलिसांना आणू नकोस. तुलाही माहिती आहे चिचू भाई म्हणजे अश्वजीत गायकवाडची ओळख कुठपर्यंत आहे. तू त्याच्याविरुद्ध काहीच करु शकत नाही कारण सर्व दोष मी माझ्यावर घेईन.
आता त्याचे मित्र येऊन आपल्याला पोलिसात तक्रार देऊ नकोस म्हणून धमकावताहेत. तरी, साडेचार वर्षांपासून प्रेमसंबंध असूनही प्रियकर रुग्णालयात भेटायला आलेला नाही. त्यातून हे खूपच स्पष्ट होतं की, त्याला मला जीवे मारायचं होतं
अशा शब्दात पीडित तरुणीनं अश्वजीत गायकवाड या तरुणावर गंभीर आरोप केलेत. यातील अश्वजीत हा काही साधासुधा व्यक्ती नाही. हुद्द्यानं तो भाजपचा बडा पदाधिकारी म्हणजेच भाजपचा पालघर जिल्हा युवा मोर्चाचा अध्यक्ष आहे. तर, त्याचे मुख्यमंत्री शिंदेंशीही संबंध असल्याचं कळतंय. कारण, MSRDC म्हणजे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे सह-संचालक अनिलकुमार गायकवाड यांचा मुलगा आहे. सध्या हे खातं शिंदेचे निकटवर्तीय असणाऱ्या दादा भुसेंकडे आहे. अश्वजीत गायकवाडचे सत्ताधाऱ्यांशी लागेबांधे असल्यामुळे कारवाई होत नसल्याचा आरोप पीडित तरुणीनं केला आहे.
या घटनेची राज्य महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. याविषयी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट टाकली आहे.
ठाणे जिल्ह्यात तरुणाने आपल्या मित्रांच्या मदतीने त्याच्या प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना प्रसार माध्यमातून समोर आली आहे. पीडित तरुणी जखमी असून मानसिक तणावाखाली आहे. या वृत्ताची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून ठाण्याचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्याकडून तातडीने अहवाल मागवला आहे.
सध्या राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरु आहे. अश्वजीत गायकवाड हे प्रकरण हिवाळी अधिवेशनातही तापण्याची शक्यता आहे. विरोधक या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांना शिंदे गट आणि भाजपला घेरण्याची शक्यता आहे. तरी, या प्रकरणातील अश्वजीत गायकवाड यांनी मात्र याविषयी अजून काहीही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे तरुणीनं केलेल्या गंभीर आरोपांवर त्यांची काय बाजू आहे, हे पाहणं महत्वाचं आहे. याशिवाय गृहमंत्रिपदी असणारे फडणवीस याविषयी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.