Gokhale Bridge : अंधेरीतील गोखले पूल वाहतुकीसाठी खुला ; एक मार्गिकेचे लोकार्पण

अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाची पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारी एक मार्गिका आज अखेर सुरू करण्यात आली.
Gokhale Bridge
Gokhale Bridge sakal
Updated on

मुंबई : अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाची पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारी एक मार्गिका आज अखेर सुरू करण्यात आली. येथील पोहच रस्त्यांचे काम, ना. सी. फडके मार्ग आणि तेली गल्ली जंक्शन येथे ग्रेड सेपरेटर या कामांचे लोकार्पण मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शहराचे पालकमंत्री, दीपक केसरकर, आमदार अमित साटम तसेच पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आदी उपस्थित होते. दरम्यान पुलाची एक मार्गिका सेवेत आल्याने अंधेरी, सांताक्रुझ परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोपाळ कृष्ण गोखले हा रेल्वे उड्डाणपूलावरील पादचारी पुलाचा काही भाग ३ जुलै २०१८ रोजी कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. त्या आधीच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पालिकेने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये अंधेरी येथील गोखले पूल धोकादायक अवस्थेत असल्याचे समोर आले.

पूल धोकादायक असल्याने ७ नोव्हेंबर २०२२ पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तांत्रिक सल्लागारांची नियुक्ती करून या उड्डाणपुलांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा पूल वाहतुकीसाठी बंद झाल्याने अंधेरी पूर्व व पश्चिमेसह वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली होती. गोखले पुलाचे काम वेगाने करावे, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी लावून धरली.

Gokhale Bridge
Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांना माझगाव न्यायालयाकडून चक्क १०० रुपये दंड ! ते वक्तव्य भोवले.. काय घडलं नेमकं ?

परंतु रेल्वे हद्दीतील पुलाचे काम कोण करणार यावर वाद निर्माण झाला. मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी लक्ष घालत पश्चिम रेल्वे व मुंबई महापालिकेच्या पूल विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर पुलाचे काम पालिका करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर पालिकेने २ डिसेंबर २०२३ रोजी पहिला गर्डर लॉंच केला. तसेच पुलाजवळील पोच रस्त्याचे काम पूर्ण केले. त्यामुळे एप्रिल २०२३ मध्ये पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र पुलासाठी लागणारे गर्डर पंजाब येथील अंबाला कंपनीत तयार करण्यास उशीर झाल्याने पुढील कामे रखडली.

हा पूल चार लेनचा असून पश्चिम द्रुतगती महामार्ग अंधेरी पूर्व ते एस व्ही रोड अंधेरी पश्चिमेला जोडतो. सोमवारी अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाची पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारी एक मार्गिका अखेर सोमवारपासून खुली करण्यात आली. तसेच येथील पोहच रस्त्यांचे काम, ना. सी. फडके मार्ग आणि तेली गल्ली जंक्शन येथे ग्रेड सेपरेटर या कामांचे लोकार्पणही करण्यात आल्याने येथील वाहतूक कोंडी सुटण्यास आता मदत होणार आहे. दरम्यान संपूर्ण पूल डिसेंबर २०२४ नंतर वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन प्रशासनाचे आहे.

  • - पुलाची लांबी– रेल्वे भूभागात– ९० मीटर

  • - रेल्वेबाहेर – पूर्वेस २१० मीटर, पश्चिमेस – १८५ मीटर

  • - पुलाची रुंदी – (रेल्वे भूभागात) – १३.५ मीटर

  • - रेल्वेच्या पूर्वेस व पश्चिमेस पोहोच रस्ते, पदपथासह- १२ मीटर (दोन्ही बाजूस)

  • - एकूण रुंदी - २४ मीटर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.