Child Cancer: नवनवीन उपचार पद्धतींमुळे कर्करुग्णांचा बरे होण्याचा दर ५८ टक्के

Child Cancer: नवनवीन उपचार पद्धतींमुळे कर्करुग्णांचा बरे होण्याचा दर ५८ टक्के
Updated on

Child Cancer Cure : कर्करोगावरील नवनवीन उपचार पद्धती आणि वाढत्या सुविधांमुळे बाल कर्करुग्णांच्या बरे होण्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रिकव्हरी दर जवळपास ५८ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

२०१० पूर्वी हा दर ४८ टक्क्यांपर्यंत होता. ही एक दिलासादायक बाब असून उपचार अर्धवट सोडण्याचा दरही घटला आहे. २०१८ मध्ये उपचार अर्धवट सोडण्याचा दर एकूण २० टक्के होता, तो आता २ टक्क्यांवर आला आहे.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या बहुउद्देशीय टीम आणि विविध सुविधांमुळे हे शक्य झाल्याचे टाटा मेमोरियल रुग्णालय आणि इम्पॅक्ट फाऊंडेशनकडून सांगण्यात आले आहे. टाटा रुग्णालयाशी संलग्नित असलेली इम्पॅक्ट फाऊंडेशन ही गेली १२ वर्षे लहान मुलांचे उपचार आणि काळजीसह त्यांचा रिअल टाईम डेटा नोंद करते.

२०१२ पासून आतापर्यंत २१, १८१ वेगवेगळ्या कर्करोगांनी ग्रस्त लहान मुले या फाऊंडेशनने नोंद केली. त्यातील ७५ टक्के म्हणजेच १६,०३८ मुलांवर टाटा रुग्णालयात उपचार करण्यात आले. १० टक्के मुलांना इतर स्थानिक केंद्रांवर उपचारांसाठी पाठवण्यात आले.

टाटा रुग्णालयाचे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट व शैक्षणिक संचालक डॉ. श्रीपाद बणावली यांनी सांगितले की, पूर्वी फक्त नवीन रुग्णांवर लक्ष दिले जायचे, आता जुन्या रुग्णांच्या आजारावरही लक्ष केंद्रित केले जाणार आहे. लहान मुलांचा कर्करोग आता चांगल्या प्रमाणात बरा होत आहे. हे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

ज्या रुग्णांचा कर्करोग बरा होऊनही पुन्हा उद्धभवतो, अशांवर लक्ष दिले जाणार आहे. जे रुग्ण कर्करोगातून बरे होतील त्यांचा आयुष्याचा दर्जा सुधारेल, अशा रीतीने यापुढे काम केले जाणार आहे. नवनवीन तंत्रज्ञान वापरले जाते. जसे की इम्युनोथेरपी, कार टी सेल थेरेपी, ब्लिनाट्युमोमॅब. लहान मुलांमध्ये ब्रेन ट्युमर, ल्युकेमिया, न्यूरोब्लास्टोमा असे कर्करोग आढळतात.

दरवर्षी साडेतीन हजार रुग्ण

जगभरात दरवर्षी निदान झालेल्या बाल कर्करोगाच्या नवीन प्रकरणांपैकी २० टक्के प्रकरणे भारतात आहेत. भारतात अंदाजे ७० हजार (१८ वर्षांपेक्षा कमी) आणि जगभरात सुमारे चार लाख रुग्ण आढळतात. टाटा रुग्णालयात दरवर्षी किमान साडेतीन हजार बाल रुग्णांवर उपचार केले जातात. यापैकी ८० टक्के मुले सामान्य श्रेणी म्हणून उपचारासाठी नोंदणीकृत आहेत.

बालपणात कर्करोग झाल्यावर मुलांच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम होतो. तो टाळून ६० टक्क्यांपर्यंत बरे होण्याचा दर घेऊन जाण्याचा आमचा यापुढे प्रयत्न आहे. यासह कुपोषण आणि कर्करोग, लिम्पोमा, ल्युकेमिया यावरही ट्रायल्स सुरू आहेत.

- डॉ. गिरीश चिन्नास्वामी, पिडियाट्रिक मेडिकल ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख

गैरसमज दूर केले!

इम्पॅक्ट फाऊंडेशनच्या कार्यालयीन प्रमुख शालिनी जाटिया यांनी सांगितले की, गेल्या आठ वर्षांत बरे होण्याचे प्रमाण ५८ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. सध्या १० पैकी सहा मुले कर्करोगातून बरी होत आहेत. आठ वर्षांपूर्वी हे प्रमाण चार होते. उपचार अर्धवट सोडणाऱ्यांची संख्या घटली आहे. आता हे प्रमाण दोन टक्क्यांवर आले आहे.

उपचार सोडण्याची अनेक कारणे आहेत. यातील एक कारण आर्थिक आहे, दुसरे कारण म्हणजे उपचारावरील कमी विश्वास आणि तिसरे कारण म्हणजे मुलींच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी पालकांची अनास्था होय. पालकांमधील हे सर्व गैरसमज दूर करण्याचे काम केले आहे.

सर्वसाधारण प्रवर्गात नोंदणी केलेल्या या मुलांच्या बहुतांश कुटुंबांची आर्थिक स्थिती बिकट आहे. याशिवाय उपचारादरम्यान पालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ज्यामध्ये त्यांच्या राहण्यापासून ते खाण्याच्या सवयींपर्यंतच्या समस्यांचा समावेश आहे. पेडियाट्रिक ऑन्कोलॉजीचा एक भाग असलेल्या इम्पॅक्ट फाऊंडेशनने या समस्या सोडवण्याचे काम हाती घेतले आहे. या समस्यांचे निदान आणि उत्तम उपचार पद्धतींमुळे बालरुग्णांचा रिकव्हरी दर वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.