नवी मुंबई- २६ सिडको महामंडळातर्फे कृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून मंगळवारी (ता. २७) सिडकोच्या नवी मुंबईतील गृहसंकुलांतील एकूण ९०२ सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला. या सदनिकांमध्ये कळंबोली, खारघर व घणसोली या विकसित नोडमधील २१३ आणि खारघर येथील व्हॅली शिल्प, स्वप्नपूर्ती व वास्तुविहार- सेलिब्रेशन गृहसंकुलांतील ६८९ सदनिका विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सिडकोतर्फे सातत्याने विविध उत्पन्न गटांतील नागरिकांकरिता गृहनिर्माण योजना राबविण्यात येतात. यावर्षीच्या गोपाळकाल्याच्या मुहूर्तावर उपलब्ध ९०२ सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत कळंबोली, खारघर आणि घणसोली नोडमधील उपलब्ध २१३ सदनिकांपैकी ३८ सदनिका या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता आणि १७५ सदनिका या सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत.