नवी मुंबई : शरीरातील रोगप्रतीकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुष्य मंत्रालयानुसार रामबाण औषध म्हणून कोव्हीड - 19 ला मारक ठरू शकणाऱ्या अर्सेनिक अल्बम 30 या होमियोपॅथिक गोळ्यांच्या वाटपावर अद्याप राज्य सरकारचे एकमत होऊ शकलेले नाही. सरकारी आरोग्य सेवेत आणि सतत कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना गोळ्यांचे वाटप करायचे की नाही अशी विचारणा एमएमआर क्षेत्रातील बहुतांश महापालिकांनी सरकारला केले आहे. परंतू सरकारचेच अद्याप गोळ्या वाटपाबाबत निश्चित न झाल्याने महापालिकांना उत्तर दिलेले नाही. परंतू दुसरीकडे अतिउत्साही समाजसेवकांनी शहरी भागात या गोळ्या वाटपांच्या कार्यक्रमांचा धुमधडाका लावला आहे.
केंद्र सरकारच्या आयुष्य मंत्रालयाने अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्या रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी प्रभावी ठरत असल्याने सेवन करण्याचे आवाहन केले आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यास रुग्णाला कोरोनावर मात करता येत असल्याने आयुष्य मंत्रालयाने या गोळ्या वाटपाला जाहीर पाठींबा दर्शवला आहे. आयुष्य मंत्रालयाच्या आवाहानाचा आधार घेत राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून उत्साहात या गोळ्यांचे वाटप जोरदारपणे सुरू झाले आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, पनवेल-उरण भागात सर्रासपणे या गोळ्यांचे वाटप केले जात आहे. होमियोपॅथी डॉक्टरांकडून या गोळ्या वाटपाला पाठींबा दिला जात आहे. शहरात एकीकडे सर्व नागरीकांना अर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप सुरू असताना मात्र सरकारी आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या गोळ्यांचे वाटप केले जात नाही. नेहमी इतर रुग्णांव्यतिरीक्त कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या महापालिकेचे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना या गोळ्यांच्या वाटपाबाबत महापालिका यंत्रणांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. एमएमआर परिक्षेत्रातील महापालिकांनी या गोळ्या वाटपाबाबत सरकारला विचारणा केली आहे. परंतू त्याबाबत काहीच न कळवण्यात आल्याने गोळ्या वाटप केले जात नाहीत.
नवी मुंबई महापालिकेच्या पत्राला उत्तर नाही
आयुष्य मंत्रालयाने आवाहन केल्यानुसार अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे कर्मचाऱ्यांना वाटप करावे की नाही याबाबत नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने मे महिन्याच्या सुरूवातीलाच राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला पत्र लिहून अभिप्राय मागितला आहे. परंतू हे पत्र पाठवून पंधरा दिवस उलटल्यानंतरही महापालिकेला कोणतेच उत्तर संबंधित विभागाने दिलेले नाही. त्यामुळे नवी मुंबई शहरात उत्साही कार्यकर्त्यांकडून एकीकडे अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे सर्रास वाटप सुरू असतानाही फक्त सरकारचा निर्णय नसल्यामुळे महापालिकेला स्वतःच्या कर्मचाऱ्यांना गोळ्यांचे वाटप करता येत नाही.
समितीचे एकमत होईना
अर्सेनिक अल्बम 30 या होमियोपॅथी गोळ्यांचे वाटप करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या या गोळ्यांबाबत दोन वेळा बैठक होऊन चर्चा झाली. परंतू निर्णय झालेला नाही. जेव्हा निर्णय होईल तेव्हा मार्गदर्शिका जाहीर केली जाईल असे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाणे यांनी सांगितले.
या गोळ्यांच्या सेवनामुळे फायदा ?
कोव्हीड 19 चा सर्वाधिक प्रादूर्भाव असलेल्या जर्मन, रशिया या देशांमध्ये अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचा वापर केल्यामुळे रुग्ण संख्या घटल्याचा दावा येथील संस्थांनी केला आहे. भारतात केरळ आणि गुजरात राज्यातही गोळ्यांचा वापर सुरू केल्याने कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्याचा दावा येथील यंत्रणांनी केला आहे. परंतू महाराष्ट्रात कुठेच या गोळ्यांच्या वाटपाला सरकारने अधिकृतरित्या पाठींबा न दिल्याने वाटपाबाबत गोंधळ कायम आहे.
होमिओपॅथीनुसार एखाद्या रुग्णांच्या लक्षणानुसार औषध बदलत असतात. त्यामुळे आर्सेनिक अल्बम 30 हे औषध सरसकट सर्वांनाच लागू होत नाही. तसेच शास्त्रीय संशोधन करून प्रमाणित केलेले नसताना हे औषध वापरु नये. - डॉ. अविनाश बोंडवे, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष
Government in confusion over Arsenic Album 30 pills, but enthusiastic activists distribute pills
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.