ग्राउंड रिपोर्ट भायखळा : इथं घरं झालीयेत गॅस चेंबर्स...

ग्राउंड रिपोर्ट भायखळा : इथं घरं झालीयेत गॅस चेंबर्स...
Updated on

मुंबई: 100 चौरस फुटांचे घर.. त्यात किमान 7-8 माणसे.. घरी राहिलो तरी सोशल डिस्टन्सिंग कसे पाळावे? किती वेळ घरात कोंडून घ्यायचे? बरं दिवसभर कोंडून घेऊ; मात्र रात्री झोपायला गॅलरीत यावे लागतेय.. तेव्हा काय करणार? असे अनेक प्रश्‍न भायखळ्यातील नागरिकांना पडत आहेत. 

गेली अनेक दशके जुन्या चाळी दाटीवाटीने या परिसरात उभ्या आहेत. आतापर्यंत 100 हून अधिक कोरोनाचे रुग्ण या परिसरात आढळले. त्यातील 80-90 टक्के रुग्ण हे चाळीतील रहिवासी असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळणे हेच आव्हान आहे. सुरुवातीला नागरिकांना त्याचे महत्त्व कळत नव्हते; मात्र आता धोका लक्षात आल्याने घोळक्‍याने उभे राहाण्याचे प्रमाण कमी झाल्याचे येथील बुजुर्ग मंडळी सांगतात, पण काही ठिकाणी गर्दीला पर्याय नाही. 

लहान घरात 24 तास स्वतःला कोंडून घेणे शक्‍य नाही. त्यामुळे कोणत्या न कोणत्या कारणाने घराबाहेर पडणाऱ्यांची संख्याही कमी नाही. त्यातच हा परिसर संवेदनशील असल्याने पोलिसांची कुमकही जास्त आहे. घरातून बाहेर पडल्यास पोलिसांचा प्रसाद मिळण्याची भीती असते. त्यामुळे अनेक जण वाडीतच; तर काही जण गल्लीत वेळ काढताना दिसतात. त्यांना सोशल डिस्टन्सिंगबद्दल विचारले तर घरात श्‍वास गुदमरतो. थोडी मोकळी हवा खायला आलो आहोत. 5-10 मिनिटांत परत जाणार असल्याचे उत्तर मिळते. पोलिसांची गस्त असल्याने पाठशिवणीचा खेळ सतत सुरू असतो. 

घरे झाली गॅस चेंबर 
नोकरी-धंद्यासाठी या परिसरातील पुरुष मंडळी दिवसभर घराबाहेर असायची. कर्ता माणूस सकाळी घराबाहेर पडल्यावर रात्रीच घरी यायचा; आता 24 तास सगळेच घरी असल्याने महिलांची मोठी कुचंबणा होत आहे. एक घर लहान, त्यात पुरुषांचा राबता वाढल्याने महिलांच्या वावरण्यावर मर्यादा आली आहे. त्यांच्यासाठी घराची अवस्था आता गॅस चेंबरसारखी होऊ लागली आहे. 

ताडवाडीची नाकेबंदी 
ताडवाडीत 13 चाळी आहेत; या चाळींतील रहिवाशांनी स्वतःवरच बंधने घालून घेतली आहेत. सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास चाळींचे प्रवेशद्वार उघडले जाते. रात्री 8 वाजता दरवाजा बंद केल्यास थेट सकाळी 9 वाजताच उघडला जातो. एवढा वेळ घरात काय, चाळीतही कोंडून घेणे अवघड आहे, पण आम्ही स्वतःवरच बंधने घालून घेतली आहेत. आज थोडी कळ काढतोय, ते उद्यासाठीच, असे रहिवासी सांगतात. 

जीवनावश्‍यक वस्तूंची कमतरता 
परिसरात भायखळा भाजी बाजार आणि फळ बाजार हे मुंबईतील दोन मोठे बाजार आहेत; मात्र या बाजारातील राबताही कमी झाला आहे. किराणा मालाच्या दुकानातही जीवनाश्‍यक वस्तूंचा तुटवडा झाला असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. 

Fact Check - "समुद्रातील मासे खाऊ नका, कारण कोरोनाचे मृतदेह फेकले जातायत समुद्रात !" काय आहे सत्य असत्य...

कष्टकऱ्यांच्या रोजीरोटीवर घाला 
जे. जे. रुग्णालयाच्या पुढचा परिसर म्हणजे मुंबईची खाऊ गल्ली; मात्र तेथील चुलीही आता विझल्या आहेत. या भागात विविध यंत्राचे सुटे भाग बनवणारे कारखाने, कपड्याचे, लोखंडाचे, औद्योगिक साहित्याचे होलसेल व्यापारी, तसेच इतर व्यापारही मोठ्या प्रमाणात आहे. या कारखान्यातील कामगार, दुकानातील कामगारांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर व्यवसायावर अवलंबून असलेल्या हमालांचीही संख्या मोठी आहे. या सर्वांवर आश्रितांप्रमाणे जगण्याची वेळ आली आहे. येथेच दुकानांच्या फळ्यावर झोपणारे हमाल मोठ्या संख्येने आहेत. तसेच 15-20 हमाल एकत्र राहणाऱ्यांची संख्या खूप आहे. त्यांना सध्या विविध संस्थांकडून जेवण, वाणसामान पुरवले जात आहे. 

ई-प्रभागात कोरोनाबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत प्रशासकीय गोंधळ आहे. कॉन्टक्‍ट ट्रेसिंग योग्य प्रमाणात होत नाही. हा परिसर दाटीवाटींचा असल्याने अधिक सजग राहणेही गरजेचे आहे. त्यासाठीच सतत प्रयत्न सुरू आहेत. 
- रईस शेख, नगरसेवक 

हा परिसर आव्हानात्मक आहे; मात्र आम्ही प्रशासनासोबत काम करतोय. नागरिकांचीही आता साथ मिळू लागली. त्यांनाही धोका समजला आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे प्रयत्न सुरू असून त्याला यश येत आहे. 
- सोनम जामसुतकर, नगरसेविका. 

आमच्यासारख्या चाळीत राहाणाऱ्यांसाठी हा काळ परीक्षेचा आहे. स्वतःच्या गरजांवर मर्यादा आणल्या आहेत. नागरिक स्वतःहून बंधन घालून घेत आहेत. 
- दिगंबर कांबळी, स्थानिक रहिवासी 


दृष्टिक्षेपात 
लोकसंख्या ः 4 ते 4.5 लाख 
झोपडपट्टीतील लोकसंख्या ः 1 ते 1.5 लाख 
चाळीतील लोकसंख्या - 2 लाखांहून अधिक 
सार्वजनिक सार्वजनिक शौचालय ः 47 (म्हणजे 350 शौचकूप) 

रुग्णांची एकूण आकडेवारी 
कोरोना रुग्ण ः 190 
हाय-रिस्क व्यक्ती ः 559 
लो-रिस्क व्यक्ती ः 2223 
आतापर्यंत मृत्यू ः 23 
कंटेन्मेन्ट झोन ः 57 

Ground report of bhaykhala mazgaon area during corona crisis
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.