Hemant Nagrale: नवी मुंबई पोलिस आयुक्त असताना झाले होते निलंबन

Hemant Nagrale: नवी मुंबई पोलिस आयुक्त असताना झाले होते निलंबन
Updated on

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी स्फोटक प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेला अटक झाल्यानंतर पाचव्या दिवशी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली.  हेमंत नगराळे यांना मुंबई पोलिस आयुक्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नगराळे यांच्याकडे राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. हा अतिरिक्त कारभाग आता रजनीश सेठ यांना देण्यात आला आहे.

सचिन वाझे याला एनआयएने अटक केल्यानंतर महाविकास आघाडीच्या मॅरेथान बैठका सुरु होत्या. रात्री उशीरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, हेमंत नगराळे, परमबीर सिंग यांच्यात तब्बल 3 तास बैठक सुरु होती. त्यानंतर बुधवारी सकाळी पुन्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यात बैठक झाली. अखेर गृहमंत्र्यांनी गृहसचिवांना बोलावून राज्याच्या पोलिस दलात मोठे बदल करण्याची घोषणा केली. यावेळी परमबीर सिंग यांची उचलबांगडी करीत त्याच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. हे पद कमी महत्त्वाचे मानले जाते. तर मुंबईचे नवे पोलिस आयुक्त म्हणून हेमंत नगराळे यांची नियुक्ती केली. 

राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार हा रजनीश सेठ यांच्याकडे सोपविला. अंबानी स्फोटक प्रकरणात परमबीर सिंग यांची देखील चौकशी होण्याची शक्यता असल्यामुळे मुंबई पोलिस आयुक्त पदावर असताना चौकशी होणे म्हणजे सरकारची बदनामी होण्यासारखी आहे. तसेच वाझे यांना सातत्याने पाठीशी घालणे, यामुळे अडचणीत आलेल्या सरकारने अखेर त्यांची उचलबांगडी केली. तर नवीन पोलिस आयुक्त म्हणून हेमंत नगराळे यांची नियुक्ती केली. 

रजनीश सेठ यांच्याकडे राज्य पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला. संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी सोपविली.

कोण आहेत हेमंत नगराळे?

हेमंत नगराळे हे मूळचे चंद्रपूरचे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी सहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नागपूर येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये पुढील शिक्षण घेतले. नगराळे हे मेकॅनिकल इंजिनीअर असून फायनान्स मॅनेजमेंट विषयात त्यांनी मास्टर्स केले आहे. 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या नगराळे यांच्याकडे सध्या महासंचालकपदाची (कायदे आणि तांत्रि विभाग) जबाबदारी आहे. त्यासोबतच त्यांना महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आली होती. 19 महिने त्यांची सेवा बाकी आहे. नगराळे यांनी आयपीएस अधिकारी म्हणून राज्यातील अनेक जिल्ह्यांसह दिल्लीतही सेवा बजावली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा या नक्षलग्रस्त भागात त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली होती. 1992 ते 1994 या काळात ते सोलापूरमध्ये पोलिस उपायुक्त होते. सोलापूर जिल्ह्यात नवे आयुक्तालय सुरू करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले होते. 1992 च्या दंगलीनंतर सोलापूरमधील कायदा आणि सुव्यस्थेची स्थिती त्यांनी उत्तम प्रकारे हाताळली होती. त्याबद्दल त्यांची प्रशंसा करण्यात आली होती.

रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक असताना 1994 ते 1996 या काळात दाभोळ ऊर्जा कंपनीशी संबंधिक भूसंपादनाचे प्रकरण त्यांनी हाताळले होते. 1996 ते 1998 मध्ये पोलिस अधीक्षक, सीआयडी आणि गुन्हे शाखेत विविध पदांवर असताना त्यांनी राज्यव्यापी असलेल्या एमपीएससी पेपर फुटी प्रकरणाची चौकशी केली होती. 

त्याचप्रमाणे, लहान मुलांचे अपहरण आणि हत्या करणा-या कुप्रसिद्ध अंजनाबाई गावित हिच्या विरोधातील प्रकरणाची चौकशीही नगराळे यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाने कालांतरानं गावित हिला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली. 1998 ते 2002 या काळात सीबीआयसाठी मुंबई आणि दिल्लीतही सेवा बजावली. सीबीआयमध्ये असताना बँक ऑफ इंडियातील केतन पारेख घोटाळा, माधोपुरा को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा, हर्षद मेहताचा घोटाळा अशा अनेक प्रकरणांच्या चौकशीत महत्त्वाची भूमिका बजावली. तेलगी मुद्रांक गैरव्यवहराची चौकशीत त्यांनी बारकाईने केलेल्या तपासाचे कौतुक झाले होते.

बँक ऑफ बडोदा दरोडा प्रकरणाचा छडा

2016 मध्ये नगराळे हे नवी मुंबईचे पोलिस आयुक्त होते. त्यावेळी तेथील बँक ऑफ बडोद्यावरील दरोड्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. या दरोड्याची देशभर चर्चा झाली होती. नगराळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अवघ्या दोन दिवसांत या प्रकरणाचा छडा लावला होता. पॉप गायक जस्टिन बिबरच्या कार्यक्रमा दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राखल्याबद्दलही सरकारने त्यांचे कौतुक केले होते. कर्तव्यात कसूर करणा-या पोलिस कर्मचा-यांवर कठोर कारवाई करणारे अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे.

नवी मुंबई पोलिस आयुक्त असताना झाले होते निलंबन

नवी मुंबईचे पोलिस आयुक्त असताना 2018 साली नगराळे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवसुली प्रकरणात बँकेचे अध्यक्ष तसेच संचालकांविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश नगराळे यांनी दिला होता. त्याप्रकरणी सभागृहाची कोणतीही अनुमती घेण्यात न आल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

राष्ट्रपती पदकासह अनेक पदके

पोलिस दलातील उल्लेखनीय कार्याबद्दल हेमंत नगराळे यांना अनेक मानसन्मान मिळाले आहेत. नगराळे यांना राष्ट्रपती पोलिस पदक, विशेष सेवा पदक आणि आंतरिक सुरक्षा पदकानं गौरवण्यात आले आहे.
 
मुंबई पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्विकारला आहे. सर्वांना माहिती आहे, मुंबई पोलिस सध्या एका कठीण समस्येतून जात आहे, असंही हेमंत नगराळे म्हणाले. ही समस्या आपण सगळ्यांच्या मदतीने, पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या मदतीने सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माझी नेमणूक केलेली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आदेशाप्रमाणे मी हा कार्यभार स्विकारला आहे. येणाऱ्या दिवसात जी मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे, त्याला चांगलं करण्याचा आणि आमच्या मुंबई शहरामधील अधिकारी कर्मचारी सगळ्यांचं सहकार्य, सहभाग या कार्यामध्ये लाभणार असल्याचंही हेमंत नगराळे यांनी सांगितलं. 

तो निश्चितपणे मला मिळेल हा विश्वास आहे. आपण सर्वांनी या कार्यात सहकार्य करावं, जेणेकरुन महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांचं नाव चांगलं होईल. कोणतीही टीका मुंबई पोलिसांवर होणार नाही, अशी परिस्थिती सर्वांच्या सहकार्याने, चांगलं सक्षम पोलिस दल म्हणून काम करु, अशी मी ग्वाही देतो, असंही ते म्हणालेत.

गेल्या काही दिवसापासून आपण जे काही बघताय, ज्यापद्धतीने अधिकाऱ्यांचा समावेश आहे, त्याचा तपास योग्य पद्धतीने रीतसर तपास एनआयए किंवा एटीएस  कडून करण्यात येत आहे. तो तपास योग्य रितीने होईल, याची खात्री आहे. जे कोणी दोषी, सहभागी असेल, त्या सर्वांवर कारवाई होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

---------------------

(संपादन- पूजा विचारे)

Hemant Nagrale suspension when Navi Mumbai Police Commissioner

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.