मुंबई- अनिल देशमुख यांनी अखेर गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. आपला राजीनामा ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करणार असून निश्चितपणे त्यांचा राजीनामा स्वीकारला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने याप्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी सुरु असताना पदावर राहणे नैतिकदृष्या योग्य नसल्यामुळे अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला असल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान, अनिल देशमुख यांच्यानंतर गृहमंत्रीपद तुर्तास मुख्यमंत्री यांच्याकडेच राहणार आहे.
अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सोपवला आहे. तुर्तात गृहमंत्रीपद मुख्यमंत्र्यांकडे राहील. पण, गृहमंत्रीपदासाठी अनेक नावे सध्या चर्चेत आहे. यात दिलीप वळसे पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. शिवाय उत्पादन शुल्क खातं अजित पवार यांच्याकडे सोपवलं जाईल अशी चर्चा आहे. असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याबाबत काय निर्णय घेतात हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी हायकोर्टात याचिका दाखल करत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांना महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट देण्यात आले होते. देशमुख हवा तसा तपास करुन घेण्याला प्राधान्य द्यायचे. माझ्या बदनामीसाठी चुकीचे आरोप करण्यात आले, अनिल देशमुखांची भ्रष्ट कारकीर्द उगड झाल्याने मला बळीचा बकरा बनवण्यात आला, असा दावा परमबीर सिंह यांनी याचिकेमध्ये केला होता. त्यामुळे अनिल देशमुख चांगलेच वादात अडकले होते.
दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या प्रकरणात आज मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिला होता. अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला १५ दिवसांच्या आत अनिल देशमुखांवरील आरोपांची प्राथमिक चौकशी सुरु करण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे देशमुख राजीनामा देतील याची जोरदार चर्चा सुरु होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.