#Hope of Life कर्करोगाबद्दल अवास्तव भय

#Hope of Life कर्करोगाबद्दल अवास्तव भय
Updated on

कर्करोगावरील खात्रीशीर उपचारासाठी देशभरात टाटा मेमोरियल रुग्णालयाची विशेष ओळख आहे. देशाच्या कानाकोपऱ्यांतून कर्करोगाचे रुग्ण उपचारासाठी ‘टाटा’मध्ये येत असतात. ‘सकाळ’च्या मुंबई आवृत्तीचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष. त्यानिमित्त ‘सकाळ’ने कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी ‘होप ऑफ लाईफ’ मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला टाटा मेमोरियल रुग्णालयानेही सहकार्याचा हात दिला आहे. त्याचाच भाग म्हणून ‘कॉफी विथ सकाळ’ या उपक्रमात टाटा मेमोरियल केंद्राचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी कर्करोगाची कारणे, उपचारपद्धती, सद्यपरिस्थिती आणि नवनवीन संशोधने याबाबत चर्चा केली.


 टाटा रुग्णालयाची स्थापना कशी झाली आणि टाटा रुग्णालय काम कसे करते?
- १९४१ मध्ये टाटा रुग्णालय सुरू झाले. तत्पूर्वी तीन वर्षे टाटा रुग्णालयाचे बांधकाम सुरू होते. ज्या वेळी टाटा रुग्णालय सुरू झाले, तेव्हा जगभरात कर्करोगाची केवळ तीनचार रुग्णालये अस्तित्वात होती. त्यापैकी टाटा एक होते. १९४१ ते १९६१ पर्यंत हे रुग्णालय टाटा समूहाने चालवले. १९६१ मध्ये त्याचे हस्तांतरण केंद्रीय अणुऊर्जा विभागाकडे करण्यात आले. त्या वेळी डॉ. होमी भाभा हे अणुऊर्जा विभागाचे सचिव होते. त्या वेळी रेडिओथेरपीचा कर्करोगावर उपचारासाठी उपयोग केला जाऊ लागला होता. भारतातही अणुऊर्जेचा वापर कर्करोगावरील उपचारासाठी करण्यास होमी भाभा यांनी प्रयत्न केले. सध्या टाटा रुग्णालय हे अणुऊर्जा विभागांतर्गत एक स्वायत्त संस्था म्हणून काम करते. टाटा रुग्णालयाला लागणारा निधी अणुऊर्जा विभागाकडून मिळतो. टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक हे थेट अणुऊर्जा विभागाच्या सचिवाला, तर सचिव थेट पंतप्रधानांना उत्तरदायी असतात.

 वाढत्या रुग्णांचे नियोजन कसे केले जाते?
- कर्करोगावरील विकेंद्रित उपचारासाठी अणुऊर्जा विभागाने ‘प्रोव्हिजन ऑफ ॲक्‍सेस’ ही योजना आखली आहे. त्यांतर्गत १९३ रुग्णालयांना एकत्र आणत ‘नॅशनल कॅन्सर ग्रीड’ची स्थापना केली आहे. यामध्ये सरकारी, खासगी, चॅरिटेबल तसेच एनजीओद्वारे चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयांचा समावेश आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे या सर्व १९३ रुग्णालयांमधील निदान, उपचार आणि वैद्यकीय सल्ला एकसारखाच दिला जातो. म्हणजे टाटा रुग्णालयात मिळणारे उपचार हे पंजाबमधील रुग्णालयातही मिळतील. म्हणजे तेथील रुग्णांना उपचारासाठी मुंबईत येण्याची गरज नाही. तसा विश्‍वास नागरिकांमध्ये रुजवला जात आहे. त्याशिवाय प्रत्येक राज्यात एक ते दोन कर्करोग रुग्णालये केंद्र सरकारने उभारावीत. राज्य सरकारने संबंधित राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कर्करोग उपचार केंद्र सुरू केल्यास किमान सर्वसामान्य कर्करोगावर तिथे उपचार केले जातील. टाटा मेमोरियल सेंटरने पंजाबमधील संगरुर येथील जिल्हा रुग्णालयात कर्करोगावरील उपचारासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध केल्या आहेत. या सुविधा इतक्‍या दर्जेदार आहेत, की उत्तर भारतातील रुग्ण संगरुर येथे उपचारासाठी येतात. त्यासह वाराणसी, विशाखापट्टणम, गुवाहाटी आदी ठिकाणीही नवे रुग्णालये सुरू केली आहेत.

 देशातील कर्करोगाबाबत...
कर्करोगाबद्दल आपल्या देशात अवास्तव भीती आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात कर्करोगाचे प्रमाण कमी आहे. आकडेवारीवरून बोलायचे झाल्यास प्रत्येकी एक लाख लोकसंख्येमागे ग्रामीण भागात ४० ते ५० रुग्ण, निमशहरी भागात ६० ते ७०, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळूरसारख्या नागरी भागात ९० ते १०० रुग्ण आढळतात. ही आकडेवारी इंग्लंड-अमेरिकेमध्ये ३०० ते ३५० पर्यंत आहे. तरीही भारतात भीती आहे. त्याचे कारण म्हणजे देशातील प्रमुख कर्करोग म्हणजे तोंडाचा, गर्भाशयाच्या मुखाचा आणि स्तनाच्या १०० कर्करुग्णांपैकी ६० ते ७० टक्के रुग्णांचा निदान झाल्यानंतर २० वर्षांनंतर मृत्यू होतो. यापैकी दगावणारे ३० ते ४० टक्के लोक पहिल्या तीन ते चार वर्षांत दगावतात. त्या तुलनेत रक्तदाब, मधुमेहाच्या १०० रुग्णांपैकी दगावणारे रुग्ण ८-१० वर्षांनंतर दगावतात. यावरून तुलना केली की रक्तदाब, मधुमेहापेक्षा कर्करोगामुळे लोक लवकर दगावतात. त्यामुळे कर्करोगामुळे लोक लवकर दगावतात, अशी भीती आपल्या देशात निर्माण झाली आहे.

 कर्करोग ः भारतातील आणि पाश्‍चात्य देशातील...
पाश्‍चात्य देशांच्या तुलनेत भारतात कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण कमी असण्यास दोन मुद्दे कारणीभूत आहेत. सामान्यतः रुग्णांचे प्रमाण प्रति एक लाख लोकसंख्येमागे मोजले जाते. अमेरिकेची लोकसंख्या भारताच्या तुलनेत फारच कमी आहे. त्याशिवाय अमेरिकेत आरोग्य तपासणीचे प्रमाण भारतापेक्षा खूपच जास्त आहे. जेवढ्या जास्त प्रमाणात तपासणी करण्यात येते, त्याप्रमाणात रुग्णांची संख्या वाढते. भारतात नेमके तपासणी करून घेण्याचे प्रमाण कमी आहे. त्याचे काही फायदेही आणि तोटेही. ते कसे तर बघा. एक लाख कर्करोगाच्या रुग्णांमागे भारतात ६४ लोक मृत्युमुखी पडतात; तर अमेरिकेत ११५ लोक. याचा अर्थ असा, की कर्करोगामुळे भारतात अमेरिकेच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण कमी आहे.

 कर्करोगावरील संशोधनाबाबत...
कर्करोगावरील संशोधन प्रामुख्याने तीन प्रकारे केले जाते. प्रयोगशाळेतील संशोधन, रुग्णालयांत केस स्टडी म्हणून केलेले संशोधन आणि सार्वजनिक पातळीवरील सर्व्हेक्षण. प्रयोगशाळेतील आणि रुग्णालयातील संशोधन हे एकमेकांना पूरक असते. शिवाय एकमेकांच्या गरजांची पूर्तता त्यातून केली जाते. सर्व्हेक्षणातील आकडेवारी हे वरील दोन संशोधनांसाठी महत्त्वाचे असतात. या सर्व्हेक्षणासाठी आम्ही भारतात २५ ठिकाणी लोकसंख्या आधारित कॅन्सर रजिस्ट्री सुरू केल्या आहेत. एका रजिस्ट्रीच्या क्षेत्रातील प्रत्येक घरी जाऊन, आरोग्य केंद्र, पॅथॉलॉजी केंद्रातील आकडेवारी गोळा केली जाते. त्यातून त्या क्षेत्रातील प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे कर्करोगाचे किती रुग्ण आहेत, किती रुग्णांची नोंद झाली, किती रुग्णांवर उपचार सुरू आहेत आदी माहितीची नोंद केली जाते. त्यावरून काही धक्कादायक माहितीही हाती लागते. उदाहरण द्यायचे झाल्यास ‘नेझोफेरिन्स कॅन्सर’ हा फक्त ईशान्य भारतातच आढळला. नेझोफेरिन्स म्हणजे नाकापासून ते श्‍वसननलिकेपर्यंतचा मार्ग. त्यामुळे अधिक संशोधन करण्याची संधी मिळाली. त्यातून अशी माहिती हाती आली, की ईशान्य भारतात ‘स्मोक्‍ड मटण’ खाण्याची पद्धत आहे. पेटत्या चुलीवर मटण लटकवले जाते. प्रसंगी ८-१० दिवस मटण तसेच लटकवलेले असते. त्यामुळे त्यात विषाणूंची वाढ होते. त्यामुळे हा कर्करोग होत असल्याचे संशोधनातून समोर आले. यावर उपाययोजना करण्यासाठी केवळ वैद्यकीय क्षेत्रावर अवलंबून न राहता त्या भागात मटण शिजवण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. देशात वैद्यकीय महाविद्यालयात, आयआयटी, खासगी संशोधन संस्थांमध्ये होणाऱ्या संशोधनाचे देशभरातील वैद्यकीय रुग्णालयासोबत मिळून सामायिक संस्था निर्माण करण्याची गरज आहे. त्यातून एकमेकांच्या गरजा लक्षात येतील आणि त्याबाबतचा प्रस्ताव आम्ही केंद्राला पाठवला आहे. येत्या वर्षभरात ती सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.

 तंबाखूविरोधी जनजागृतीचा प्रभाव
गत काही वर्षांपासून देशात तंबाखूविरोधी जनजागृती सुरू आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. महाराष्ट्र विशेषतः मुंबईच्या बाबतीत बोलायचे झाल्यास गत चार वर्षांत मुंबईत तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी झाले आहे; मात्र धूम्रपानाच्या तुलनेत तंबाखूसेवनामुळे होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. म्हणजे तंबाखू खाल्याने तोंडाचा, जिभेचा, घशाचा, अन्ननलिकेचा कर्करोग होतो. त्यामुळे हळूहळू जर तंबाखू बंद केला, तर देशातील कर्करोगाचे प्रमाण ४० टक्‍क्‍याने कमी होईल. देशात पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्याने अनेक प्रकारचे कर्करोग कमी झाले आहेत. आतड्याचा, जठराचा, गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण खूप कमी झाले आहे. गर्भाशयाचा कर्करोग हा एचपीव्हीच्या (ह्युमिन पॅपिलोमा व्हायरस) इन्फेक्‍शनमुळे होतो. त्याचा प्रादुर्भाव होण्याचे कारण विचित्र आहे. पुरुषांनी स्वतःची वैयक्तिक निगा योग्य पद्धतीने न राखल्याने लैंगिक संबंधांवेळी हे विषाणू महिलांच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे पुरुषांनी वैयक्तिक निगा राखणे फार गरजेचे आहे.

 वैद्यकीय सल्ला एका क्‍लिकवर
टाटा स्मारक रुग्णालय आणि नॅशनल कॅन्सर ग्रीडच्या वतीने ‘नव्या’ हे ऑनलाईन कर्करोग सल्लागार पोर्टल सुरू करण्यात आले आहे. भारतासह विदेशातील कोणत्याही व्यक्तीने या पोर्टलवर त्याची माहिती अपलोड केल्यास तज्ज्ञांकडून निःशुल्क वैद्यकीय सल्ला दिला जातो.
आजीच्या बटव्यातून...
निरोगी आणि चांगले आरोग्यदायी आयुष्य जगण्यासाठी माझ्या आजीने काही गमतीशीर नियम घालून दिले होते. ते आपण पाळले तर आपलाच फायदा होऊ शकतो.
दहाव्या वर्षी आईचे बोट सोडावे...
 विसाव्या वर्षी खेळणी खेळणे सोडावे...
 तिसाव्या वर्षी इकडे-तिकडे बघणे सोडावे...
 चाळिसाव्या वर्षी रात्रीचे जेवण कमी करावे...
 पन्नासाव्या वर्षी बाहेरचे जेवण बंद करावे...
 साठाव्या वर्षी आहे ते सुरू ठेवावे...
 सत्तराव्या वर्षी आंबट खाणे बंद करावे...
 ऐंशिव्या वर्षी कठीण गादीवर झोपावे...
 नव्वदाव्या वर्षी जगण्याची आसक्ती सोडावी...
 शंभराव्या वर्षी आयुष्य संपवावे...

- शब्दांकन : ऋषिराज तायडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.