मुंबईमध्ये हॉटेलचा धंदा अद्यापही मंदच, खवय्यांच्या मनातील धास्ती जाईना

मुंबईमध्ये हॉटेलचा धंदा अद्यापही मंदच, खवय्यांच्या मनातील धास्ती जाईना
Updated on

मुंबईः मुंबईतील हॉटेल सुरु करण्यास सरकारने संमती देऊन महिना झाला तरीही त्यांचा व्यवसाय रडतखडत सुरु असल्याचे चित्र आहे. अजूनही खवय्यांच्या मनात धास्ती आहे. उपनगरी रेल्वेसह इतर सर्व सेवा सुरु झाल्या की मगच लोकांना धीर येऊन ते हॉटेलात येऊ लागतील, असेही हॉटेलमालक बोलत आहेत. 

राज्य सरकार हळूहळू एकएक सेवा सुरु करत असले तरी त्यांना ग्राहकांचा प्रतिसाद कमीच आहे, मग ते मॉल असोत की शॉपिंग सेंटर. सध्या हॉटेल देखील 33 ते 50 टक्के क्षमतेनेच सुरु असल्याने त्यांचा एकंदर धंदा देखील तेवढाच होत असल्याचे व्यावसायिकांचे सांगणे आहे. अर्थात हॉटेल पूर्ण क्षमतेने सुरु झाली आणि वेळही वाढवली तरीही ग्राहकांचा प्रतिसाद कसा राहील, याचीही त्यांना शंका आहे. 

सध्या मुंबईतील जेमतेम 60 टक्के रेस्टोरंटच उघडली आहेत. भाडेतत्त्वावर असलेल्या हॉटेलचे भाडे मालकाने कमी केले नाही तर तो धंदा दुसऱ्यांना द्यायचा असे चालक ठरवित आहेत. अशाप्रकारे यावर्षी मुंबईत अनेक ठिकाणी हॉटेल मालकीचेही हस्तांतरण होईल असे दिसते. अजूनही उच्च मध्यमवर्गीय कुटुंबे हॉटेलात येण्यास घाबरत आहेत. छोट्या टिपिकल उडपी रेस्टोरंटमध्ये लोकं येत आहेत, पण मोठी आलिशान हॉटेल अजूनही रिकामी आहेत, असे आहार या हॉटेलचालक-मालक संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी सांगितले.  

अजूनही अनेक हॉटेलांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. संध्याकाळच्या प्राईम टाईममध्ये ग्राहकांना सेवा देण्यास जेमतेम दोन तीन तासच मिळतात, ते पुरेसे होत नाहीत. बार चालविणाऱ्या हॉटेलना वर्षाची सुमारे आठ लाख रुपये लिकर फी भरावी लागते. हॉटेल बंद असलेल्या काळापुरती तरी त्यात माफी द्यावी, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. हॉटेल बंद ठेवली तर कोणीच येणार नाही आणि धंदा सुरुच होणार नाही. निदान उघडी ठेवली तर हळुहळू लोक येतील आणि धंदा वेग पकडेल म्हणून आम्ही तोटा सोसून हॉटेल सुरु ठेवली आहेत, असेही शेट्टी यांनी सांगितले.

अजूनही ग्राहक आणि त्यातही उच्चमध्यमवर्गीय कुटुंबे फारशी येत नाहीत, असे सायनच्या मराठा एक्सलन्सी हॉटेलचे शिवाजी नरवडे म्हणाले. दिवाळीत लोक खरेदीला बाजारात येतात आणि तसेच ते पुढे हॉटेलांकडे वळतात असा नेहमीचा अनुभव आहे. त्यामुळे त्यादरम्यान हॉटेलांमधील गर्दी वाढेल अशी आशा आहे. खरे पाहता शाळा, मंदिरं, कार्यालये, रेल्वेसेवा सुरु झाली. सगळ्या गोष्टी पहिल्याप्रमाणे झाल्या की मगच लोकांची भीती जाईल आणि ते हॉटेलांमध्ये येतील. अजूनही धंदा कमी आहे, कर्मचारीही आले नाहीत, मात्र आहेत त्यातच आम्ही चालवून घेतो, आम्ही मेन्यूदेखील पूर्ण ठेवला आहे, असेही नरवडे यांनी सांगितले.

ग्राहक यायला लागले आहेत, पण अजूनही धंदा म्हणावा तसा जोर पकडत नाही, असे मशीद बंदर येथील सलमान हॉटेलच्या रशीद खान यांनी सांगितले. एकटे दुकटे नोकरदार ग्राहक येतात, काही जण पार्सलही घेऊन जातात, त्यातही अनेकांना अजून समिष भोजन घेण्यास धास्ती वाटत असल्याचे दिसते. कोरोनाची भीती जाईपर्यंत असेच चित्र राहील अशी भीती वाटत असल्याचेही ते म्हणाले.

-------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

The hotel business in Mumbai is still sluggish

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.