नवी मुंबई : गावाकडे दुष्काळात उपाशी मरण्यापेक्षा शहरात जाऊन काही तरी कामधंदा करून उदरनिर्वाह चालवण्याच्या हेतूने खारघरमध्ये आलेल्या शेकडो दुष्काळग्रस्त कुटुंबियांवर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने दिलेले धान्य या कुटुंबांपर्यंत पोहोचत नसल्याने खारघर सेक्टर १३ मधील पदपथावर रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांकडे या कुटुंबातील महिला भीक मागताना दिसतात.
राज्याच्या दुष्काळी भागात शेतीकाम नसल्यामुळे स्वतःच्या कुटुंबांसाठी हजारो कुटुंब नवी मुंबईत नोकरीच्या बहाण्याने येत असतात.
वाशिम, यवतमाळ, परभणी येथील अशीच शेकडो कुटुंब काही महिन्यांपूर्वी खारघरमध्ये आली आहेत. खारघरमधील गावठाणात लहान घरे भाड्याने घेऊन हाताला मिळेल ते काम शोधून कुटुंबांचे पोट पाळत होते. कुटुंबांतील पुरूष मंडळी नाक्यावर उभे राहून बांधकाम साईटवर बिगारी म्हणून हजेरीवर काम करतात. तर महिला सदस्य शहरातील सोसायट्यांमध्ये जाऊन धुणीभांडी करण्याचे काम करतात. परंतू कोरोनामुळे घरोघरी काम करणाऱ्या महिलांचे काम बंद करण्यात आले आहे.
सुरूवातीला काही दिवसांचा पगार काही लोकांना मिळाला खरा, परंतू आता पूढील चालू महिन्यात एकही दिवस हाताला काम न मिळाल्यामुळे कुटुबांतील महिला व पुरूष मंडळी बेरोजगार झाली आहेत. संचारबंदीमुळे खारघरमध्ये सुरू असणारी इमारतींची बांधकामे देखील विकासकांनी थांबवलेली आहे. त्यामुळे बांधकामच थांबवल्याने मजुरांची गरज नसल्याने हजेरीने मजूर घेण्याचे कामही थांबवण्यात आले आहेत. या परिस्थितीत कामच मिळत नसल्यामुळे घरात पैसे येणार कुठून. खिशात पैसे नसल्यामुळे घरात अन्न-धान्याची कमालीची टंचाई निर्माण झाली आहे. यात भर म्हणून काय तर महिनाभराचे भाडे थकल्यामुळे गावातील घर मालकांनीही अनेक कुटुबांना घर खाली करण्यामागे तगादा लावला आहे. अशा परिस्थितीतही हाताला कुठेतरी काम मिळेल, नाही तर कमीत कमी कोणत्या तरी सामाजिक संघटनांकडून तयार केलेले अथवा न शिजवलेले अन्न-धान्य मिळेल म्हणून रोज खारघरच्या रस्त्यावर जीव हातावर घेऊन काही महिला भीक मागताना दिसत आहेत.
घरोघरी जाऊन धुणी भांडी करणारे काम आता बंद झाले. घरातील पोरांसाठी काही तरी खायाला मिळेल म्हणून भर उन्हात रस्त्यावर यावं लागतं साहेब असे अमरावतीहून आलेल्या सुनीता राठोड यांनी गहीवरून सांगितले. बांधकाम साईडवर आमचे मालक जात होतं. पण आता ते काम बंद झाल्यामुळे आम्ही रस्त्यावर कोण तरी काम देईल म्हणून आलो आहोत. असे परभणीहून काही महिन्यांपूर्वीच आलेल्या सविता चव्हाण हिने सांगितले.
गावाकडे शेतात दुष्काळ हाय..म्हणून आम्ही शहरात आलो..पण इकडे सरकारने बंद केल्यामुळे हातातलं सर्व काम गेलं. उपाशी मरण्यापेक्षा चिल्यापील्यांसाठी भीक मागितलेली काय वाईट असे यवतमाळच्या सावित्री राठोड हिने सांगितले. खारघर गावात आमच्यासारखे तीनशे लोक आहेत. कोणाकोणासाठी काम बघायचे असे दुर्योधन राठोड याने सांगितले. खारघरमध्ये काही सामाजिक संघटना आणि पोलिसांकडून रस्त्यावर बसणाऱ्या लोकांना अन्न-धान्य पोहोचवण्याचे काम करीत आहेत. मात्र हे मदतीचे हात या कुटुंबांपर्यंत न पोहोचल्याने या कामगारांवर उपासमारीचे संकट आले आहे.
house workers and maide are seeking help because of corona read story
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.