मुंबई ः प्रतिकूल अवस्थेतही अंधेरी सीप्झमधील हिरेनिर्मिती करणाऱ्या उद्योगांनी युरोप अमेरिकेत भारताचा ध्वज फडकवत ठेवला असून मे पासून आतापर्यंत त्यांनी सुमारे चार हजार कोटी रुपयांचे दागिने निर्यात केले आहेत.
अंधेरी सीप्झ या विशेष औद्योगिक क्षेत्रात हिऱ्यांचे दागिने घडवून ते निर्यात केले जातात. कोरोनाच्या टाळेबंदीमुळे मार्च पासून बंद पडलेले उद्योग, गावी गेलेले कर्मचारी, नंतर उद्योग सुरु झाले तरीही अपुरे कर्मचारी, वाहतुकीच्या सोयींअभावी निर्यातीत येणारे अडथळे, यावर मात करून या उद्योगांचे काम सुरु आहे. अद्यापही उपनगरी रेल्वेसेवा सुरु न झाल्याने कामगारांना कामावर येण्यास मोठाच त्रास होत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना मर्यादित वेळेत रेल्वेत प्रवेश द्यावा, अशी मागणी सीप्झ जेम्स अँड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजीव पंड्या यांनी केली आहे.
सीप्झ मध्ये हिऱ्यांच्या दागिन्यांचे दीडशे कारखाने असून त्यात पन्नास हजार कर्मचारी कामाला आहेत. हे उद्योग 1988 मध्ये सुरु झाले तेव्हा तिथे बंगाली कारागिरांचे वर्चस्व होते, मात्र आता येथील 70 कामगार मराठीभाषक असल्याचे पंड्या यांचे म्हणणे आहे. यातील मुंबईबाहेर लांब अंतरावर राहणारे चार हजार कामगार असून त्यांना रेल्वेच सोयीस्कर असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे.
युरोप व अमेरिकेत दागिने निर्यातीसाठी मोठी बाजारपेठ असून सप्टेंबर ते डिसेंबर हा तेथे खरा मोसम असतो. नाताळ तसेच नवीन वर्षाच्या निमित्ताने तेथे या काळात दागिन्यांना मोठीच मागणी असते. कोरोनाची साथ संपल्यावर येथून आता पुन्हा दागिन्यांना मागणी सुरु झाली असून हे प्रमाण फेब्रुवारीपेक्षा जास्त असल्याचे पंड्या यांचे म्हणणे आहे. चीन व अमेरिका यांच्यात तणाव वाढत असल्याने चीनी दागिने घेणारे ग्राहक आता भारताकडे वळण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकी बाजारपेठेतील दागिन्यांच्या विक्रीत सीप्झचा वाटा 18 टक्के तर चीन व हाँगकाँगचा 15 टक्के आहे. यातील चीनचा अर्धा वाटा हिसकावून घेण्याची आपली क्षमता आहे. यात सरकारने साह्य केल्यास दोन वर्षांत आपली या क्षेत्रातील निर्यात व रोजगारनिर्मिती पन्नास टक्के वाढेल, असेही पंड्या यांनी सकाळ ला सांगितले.
सीप्झमधील दागिने निर्यात
मे - 216 कोटी 48 लाख रु.
जून - 510 कोटी रु.
जुलै - 842 कोटी रु.
सप्टेंबर - 1653 कोटी रु.
------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.