नवी मुंबई, ता. १२ (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील तीन दिवसात सहा वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू तर पाच जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे यातील तीन अपघात ठाणे- बेलापूर मार्गावरील तुर्भे व ऐरोली येथे घडले आहेत. या अपघाताला जबाबदार असलेल्या पाच वाहनचालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पळून गेलेल्या एका वाहन चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सात ते नऊ नोव्हेंबर या तीन दिवसामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अपघात घडले आहेत. तुर्भे स्टोअर्स येथे राहणारे रामलाल प्रसाद ( वय ६०) हे सानपाडा येथे सुरक्षारक्षक म्हणून कामाला असून गत आठ नोव्हेंबर रोजी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास ते कामावरून सुटल्यांनतर तुर्भे रेल्वे स्टेशन समोरील ठाणे-बेलापूर मार्ग ओलांडुन तुर्भे स्टोअर्स येथे आपल्या घरी जात होते.