स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार असलेला फडके वाडा पुनर्जीवित

वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटिशांची जुलमी राजवट उलथवण्याचा निर्धार याच वाड्यात केला होता
phadake wada
phadake wadasakal
Updated on

पनवेल : इंग्रजांच्या विरोधात बंड उभारून त्यांना सळो की पळो करून सोडणारे आणि स्वातंत्र्य लढ्यासाठी आर्थिक पाठबळ उभे करणाऱ्या वासुदेव बळवंत फडके तथा आद्य क्रांतिकारकांचे जन्मस्थळ रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्याच्या शिरढोण गावात आहे. फडके यांचा जन्म ४ नोव्हेंबर १८४५ ला शिरढोण येथील फडके वाड्यात झाला. स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार असलेला हाच फडके वाडा अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा दिमाखात उभा राहिला आहे.

वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यामुळे राष्ट्रतेजाचे बाळकडू त्यांना लहानपणीच मिळाले होते. फडके यांचे राष्ट्रतेज-राष्ट्रप्रेम मोठेपणी उफाळून आले. त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात सशस्त्र बंड पुकारले होते. ब्रिटिशांची जुलमी राजवट उलथून टाकण्याचा निर्धार त्‍यांनी याच वाड्यात केला होता. त्‍यांच्या मृत्यूनंतर कित्येक वर्षे शिरढोणच्या या वाड्यात त्यांच्या कुटुंबीयांचे वास्तव्य होते. परंतु, नंतरच्या काळात नोकरी-चाकरीच्या निमित्ताने सारे इच्छितस्थळी निघून गेले आणि वाडा एकाकी उरला. मग वाड्याची ‘उद्‍ध्वस्त धर्मशाळा’ व्हायला वेळ लागला नाही. त्यानंतर हा वाडा अगदीच मोडकळीस आला होता.

या वाड्याचे जतन करून तो स्मारक म्हणून घोषित करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ लोकप्रतिनिधी तसेच फडकेप्रेमींकडून होत होती; परंतु राज्य सरकारचे त्याकडे लक्ष जात नव्हते. स्थानिक प्रशासनाकडेही तेवढा पैसा नव्हता. मात्र, स्थानिक गावकऱ्यांच्या, जनतेच्या, लोकप्रतिनिधींच्या सततच्या रेट्यामुळेच राज्य पुरातत्त्व विभागाने हा वाडा ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केला. तरीही या वाड्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होण्यासाठी दहा वर्षांचा कालावधी जावा लागला. अखेर फेब्रुवारी २०१३ मध्ये वाड्याच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून मे २०१३मध्ये वाड्याच्या कामाला सुरुवात झाली. आणि दीड वर्षात हा वाडा दिमाखात उभा राहिला.

स्वातंत्र्य लढ्यात अटक

सुरुवातीला ऐक्य वर्धिनीच्या माध्यमातून विखुरलेल्या समाजाला एकत्रित करण्याचे काम त्यांनी केले. त्यानंतर रामोशी, भिल्ल, कोळी आणि आगरी समाजाला एकत्र करून स्वत:ची सेना तयार केली. ब्रिटिश सरकारची तिजोरी आणि ब्रिटिश व्यापाऱ्यांना लुटण्याचे काम या सेनेच्या माध्यमातून केले. लुटलेल्या पैशांचा विनियोग त्यांनी समाजाच्या उत्कर्षांसाठी केला. ब्रिटिश सरकारच्या मनात त्यांनी प्रचंड धास्ती निर्माण केली होती. त्यांच्या प्रेरणेतून देशात क्रांतीची मशाल पेटली गेली. त्यांच्या कारवायांनी त्रस्त झालेल्या ब्रिटिशांनी वासुदेवांना पकडून देणा‍ऱ्यास मोठे बक्षीस जाहीर केले. त्या बक्षिसाच्या प्रलोभनामुळेच ब्रिटिशांना त्यांचा पत्ता कळला आणि विजापूरजवळील देवर नावडगी गावात फडके यांना अटक झाली. सुरक्षेच्या कारणासाठी ब्रिटिशांनी त्यांची रवानगी एडनला केली आणि तेथील तुरुंगातच त्यांचा अखेर १८८३मध्ये मृत्यू झाला.

दोघा अधिकाऱ्यांचा पुढाकार

फडके वाडा पुनर्जीवित करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यात दोन सरकारी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. पनवेलचे तहसीलदार पवन चांडक आणि महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाचे संचालक संजय पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. यापूर्वी लोकप्रतिनिधींनी या वास्तूच्या नूतनीकरणाची मागणी वेळोवेळी केली होती; परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नव्हते. अनेकांच्या मागणीनंतर पनवेलमधील दोन सरकारी अधिकाऱ्यांनी ही बाब मनावर घेतली. ३०० वर्षांपेक्षा जुने असलेले आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मस्थळ पुनरुज्जीवित करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. अनेकांच्या प्रयत्नामुळे स्वातंत्र्याच्या पहिल्या लढाईतला साक्षीदार फडके वाडा आज डौलाने उभा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.