ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडेच (एटीएस) कायम असून स्फोटकं लिंक प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास एजन्सीकडे (एनआयए) सोपवण्यात आला आहे. एटीएसने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
कालच (रविवार) महाराष्ट्र एटीएसने याप्रकरणी हत्येचा, कट कारस्थान रचल्याचा तसेच पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, रिलायन्स उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार आढळल्याने खळबळ उडाली होती. ही कार मनसुख हिरेन यांच्या मालकिची असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अँगलचा तपास एनआयएद्वारे करण्यात येणार असल्याचं आज (सोमवार) स्पष्ट करण्यात आलं आहे. एएनआयनं याप्रकरणी नव्यानं गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
शवविच्छेदन अहवाल हिरेन कुटुंबियांकडे सोपवला
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्कॉर्पियो गाडीचे मालक आणि ठाण्याचे व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र एटीएसने रविवारी गुन्हेगारी कट रचणे, हत्या आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांना आत्महत्येचा संशय आहे तर हिरेन कुटुंबियांनी मनसुख यांची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, शवविच्छेदन अहवाल हिरेन यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आला आहे.
हिरेन कुटुंबियांचा हत्येचा आरोप
दरम्यान, हिरेन कुटुंबियांनी गंभीर आरोप करताना म्हटलं की, मनसुख हिरेन यांची हत्या करुन त्यांचा मृतदेह खाडीमध्ये टाकून देण्यात आला. हिरेन कुटुंबियांच्या माहितीनुसार, मनसुख यांचा मोबाईलचं शेवटचं लोकेशन पालघर जिल्ह्यातील विरार भागात दाखवण्यात आलं आहे. तर त्यांचा मृतदेह हा ठाण्यातील खाडीमध्ये आढळून आला आहे. या दोन्ही लोकेशनमध्ये इतकं अंतर कसं काय असू शकतं असा सवालही त्यांनी केला आहे. हिरेन कुटुंबांचा आरोप आहे की, हा मोठा कट आहे. मनसुख यांच्या शेजाऱ्यांनीही सांगितलं की ते सोसायटीतील मुलांना पोहायला शिकवत होते. त्यामुळे ते पाण्यात बुडू शकत नाहीत.
संशयास्पद स्थितीत आढळला होता मृतदेह
मनसुख हिरेन हे गुरुवारपासून गायब होते. बेपत्ता असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी शुक्रवारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याचवेळी एक बातमी आली होती की ठाण्याच्या खाडीमध्ये एक मृतदेह सापडला आहे. त्यानंतर पोलिसांनी हिरेन कुटुंबियांना घटनास्थळी नेले आणि मृतदेहाची ओळख पटली. जेव्हा मुंब्र्याच्या खाडीत मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला तेव्हा त्यांच्या तोंडावर मास्क लावलेला होता आणि मास्कच्या आतमध्ये सहा-सात रुमाल कोंबलेले होते. यावरुन त्यांची हत्या करण्यात आल्याचे दिसून येत होते. मात्र, शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरिरावर कोणतीही जखम नसल्याचा उल्लेख आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.