रायगड अजिंक्‍य पदावर चरी संघाची मोहर 

रायगड अजिंक्‍य पदावर चरी संघाची मोहर 
Updated on

उरण : बोकडवीरा येथील रायगड जिल्हा कबड्डी अजिंक्‍यपद आणि निवड चाचणीचा थरार रविवारी रात्री 1 वाजता संपला. अलोट प्रेक्षकांच्या अभूतपूर्व उपस्थितीत जय हनुमान चरी संघाने अंतिम सामन्यात म्हसोबा पेझारी संघावर अवघ्या 2 गुणांनी विजयश्री मिळवत जिल्हा अजिंक्‍यपदावर नाव कोरले. त्यावेळी चरी संघाच्या पाठीराख्यांनी एकच जल्लोष केला. शेवटच्या चढाईपर्यंत हा सामना रंगला होता. 

अतिशय कल्पक नियोजन आणि सुसज्ज मैदानांमुळे ही जिल्हा स्पर्धा जणू राष्ट्रीय स्पर्धा असल्याचे वाटत होते. महिलांच्या गटात कर्नाळा स्पोर्टस्‌ने बाजी मारल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष पुरषांच्या अंतिम सामन्यात बाजी कोण मारणार याकडे लागले होते. 

बोकडवीरा येथील गणेश क्‍लबच्या मैदानावर रात्री 10 वाजता पहिला उपांत्य फेरीचा सामना एकतर्फी झाला. यामध्ये जय हनुमान चरी संघाने यजमान श्री गणेश क्‍लब संघावर 30-06 अशा 24 गुणांच्या फरकाने मात केली. या वेळी चारीचा राज्य संघातून खेळणारा खेळाडू बिपीन थाळी याला थांबविणे बोकडवीराच्या राज्य संघातून खेळणारा खेळाडू मयूर कदम याला शक्‍य झाले नाही. दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना पांडवादेवी रायवाडी आणि म्हसोबा पेझारी संघादरम्यान खेळला गेला. यात म्हसोबा पेझारी संघाने 26-17 अशा गुणफलकानुसार नऊ गुणांनी विजय मिळवित अंतिम फेरीमध्ये धडक मारली. 

प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या मैदानात रात्री 11.45 वाजता जय हनुमान चरी आणि म्हसोबा पेझारी या संघात सुरू झालेला अंतिम सामना प्रत्येक क्षणाला उत्कंठावर्धक ठरत होता. दोन्ही संघात असलेले राष्ट्रीय खेळाडू बिपीन थाळी आणि मितेश पाटील यांनी त्यांची कामगिरी चोख बजावल्यामुळे सामना रंगतदार झाला. पहिल्या डावात चरीच्या बिपीन थाळीवर अंकुश ठेवण्यात म्हसोबा पेझारीला यश आल्याने मध्यंतरीला म्हसोबा पेझारी संघ 10 गुणांनी आघाडीवर होता. परंतु, दुसऱ्या डावात चरीचा राष्ट्रीय खेळाडू बिपीन थळीने शेवटच्या क्षणी उत्कृष्ट खेळ केला; तर जय हनुमान चरी संघाने सांघिक खेळ करत 20-18 अशा गुण फलकानुसार दोन गुणांनी निसटता विजय मिळवित अजिंक्‍य पदावर आपले नाव कोरले. तिसरा क्रमांक श्री गणेश क्‍लब बोकडवीरा आणि आणि चौथा क्रमांक पांडवादेवी रायवाडी संघाने पटकावले. 

जल्लोष आणि दु:ख 
कबड्डीच्या अंतिम सामन्याच्या मध्यांतराला पिछाडीवर असलेला तसेच शेवटची काही मिनिटे 7 गुणांनी पिछाडीवर असलेला आपल्या संघाने विजयश्री खेचून आणल्याने जय हनुमान चरी संघाच्या खेळाडूंनी मैदानावर एकच जल्लोष केला; तर सामन्याच्या शेवटच्या क्षणी हातात आलेला जिल्हा आजिंक्‍यपद चषक निसटल्यामुळे म्हसोबा पेझारीच्या संघाला आणि पाठीराख्यांना भावनेवर ताबा ठेवता आला नाही. इतर खेळाडूंसोबतच त्यांचा राष्ट्रीय खेळाडू मितेश पाटील याला अश्रू अनावर झाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.