मुंबईतील ‘या’ ठिकाणचं रेल्वे क्रॉसिंग ठरतंय धोक्याचं!

मुंबईतील ‘या’ ठिकाणचं रेल्वे क्रॉसिंग ठरतंय धोक्याचं!
मुंबईतील ‘या’ ठिकाणचं रेल्वे क्रॉसिंग ठरतंय धोक्याचं!
Updated on

नवी मुंबई : जुईनगर आणि सानपाडा नोडला जोडणाऱ्या नाल्याजवळील रेल्वे क्रॉसिंगवर महापालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाला प्रतीक्षा करावी लागणार आहे. पालिकेच्या अभियांत्रिकी विभागामार्फत आतापर्यंत चार वेळा निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र, या निविदा प्रक्रियेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद लाभत नसल्यामुळे रेल्वे रूळ ओलांडताना झालेल्या अपघाताला एक वर्षे उलटल्यानंतरही उड्डाणपूल उभारण्याची प्रक्रिया कागदावरच राहिली आहे. 

२४ नोव्हेंबर २०१८ ला जुईनगर-सानपाडा येथील रेल्वे रुळावर कारशेडला जाणाऱ्या लोकल ट्रेनने महापालिकेच्या एनएमएमटीला जोरदार धडक दिली होती. नवी मुंबई शहरात पहिल्यांदाच झालेल्या या भीषण अपघातामुळे संपूर्ण पालिका हादरून गेली होती. रेल्वे प्रशासनाने अपघात झाल्यावर महापालिकेला नोटीस बजावून दंड आकारण्यास बजावले होते. तसेच हा रस्ता कायमचा बंद करण्याकरीता पावलेही उचलली होती. महापालिकेचा रस्ता खोदण्यासाठी यंत्रणाही पाचारण केली होती; परंतु तत्कालीन आयुक्त डॉ. एन. रामास्वामी हे निवडणुकांसाठी तेलंगणा राज्यात कर्तव्यावर असतानाही त्यांनी तिथून दखल घेत दूरध्वनीवरून पालिकेच्या अधिकारी, रेल्वे अधिकारी आणि पोलिस प्रशासनासोबत समन्वय साधला होता. तसेच पालिका स्तरावर यंत्रणांची एक बैठक घेऊन तत्काळ उड्डाणपुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार पालिकेच्या अभियांत्रिकी विभागामार्फत रेल्वे रुळांवर दीड किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल तयार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. तीन मार्गिका असलेला हा उड्डाणपूल तयार झाल्यावर जुईनगर व सानपाडा नोड एकमेकांना जोडले जाणार आहेत. हा रस्ता प्रचंड वर्दळीचा असतानाही वारंवार लोकल ट्रेन कारशेडला जाताना अपघात होण्याची दाट शक्‍यता असते. त्याचे प्रमाण कमी होणार आहे. नवी मुंबई शहरात बहुतांश सर्व रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलांमुळे सुरक्षित झाले आहेत. फक्त सानपाडा येथील रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल नसल्यामुळे धोका पत्करून येथील नागरिक रूळ ओलांडण्याचे काम करीत आहेत. 

पुन्हा अपघात होणार?
सानपाडा-जुईनगर रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल तयार करण्यासाठी ४८ कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार आतापर्यंत चार वेळा निविदा प्रक्रिया राबवली. मात्र, तीन वेळा निविदा प्रक्रियेला एकाही कंत्राटदाराने सहभाग घेतला नाही. त्यामुळे या मार्गावर आजही रेल्वेचे रूळ ओलांडून रेल्वेची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रेल्वे अपघात होण्याचा धोका बळावला आहे. 

जुईनगर रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल उभारण्याच्या दिशेने प्रशासनाने पावले उचलली आहेत. मात्र, अद्याप कंत्राटदारांचा प्रतिसाद लाभत नाही. निविदेत काही जाचक अटी आहेत की नाही, याची शहानिशा करण्याच्या सूचना अभियांत्रिकी विभागाला दिल्या आहेत. 
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.