डोंबिवली - कल्याण पूर्वेत शिवसेना शिंदे गट व भाजप मध्ये वातावरण चांगलेच तापले आहे. समाज माध्यमातून एकमेकांवर शिंतोडे उडविल्यानंतर समोरासमोर येऊन एकमेकांना भिडण्याचे आव्हान भाजप आमदार गणपत गायकवाड व शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी केले होते.
हा राजकीय वाद चांगलाच पेटण्याची चिन्हे असताना पालिकेच्या ड प्रभाग कार्यालयासमोर भाजप आमदार समर्थकांसह हजर झाले. पण शिंदे गटाचे शहर प्रमुखांची वाट मात्र पोलिसांनी रोखल्याने दोन्ही गायकवाड काही समोरासमोर आले नाही.
शिंदे गटाचे महेश यांना अर्ध्या रस्त्यातूनच कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी भाजप समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यावर शिंदे समर्थकांनी देखील पोलीस स्टेशनच्या आवारात भाजप विरोधात घोषणाबाजी करत आपली ताकद दाखवली. यामुळे हा वाद येथेच शमला की पुन्हा उफाळणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
कल्याण पूर्वेत भाजप आणि शिवसेना शिंदे समर्थक यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. राज्यात शिंदे व फडणवीस यांचे मनोमिलन असले तरी कल्याण लोकसभा मतदारसंघात मात्र शिंदे व भाजप कार्यकर्त्यांचे एकमेकांशी सूत काही केल्या जुळेना झाले आहे.
कल्याण पूर्वेत भाजपचे आमदार गणपत गायकवाड व शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात सुरुवातीपासून वाद आहे. त्यात बुधवारी भाजपच्या समर्थकांना शिंदे गटाच्या नगरसेवकाच्या समर्थकांनी मारहाण केल्याने हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
या मारहाणीच्या घटनेनंतर रात्री समाज माध्यमातून एका ग्रुपवर भाजप आमदार गायकवाड व शिंदे गट शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी एकमेकांवर शिंतोडे उडविले. यावेळी भ्रष्टाचार, अनधिकृत बांधकाम, रजिस्ट्रेशन, विकास कामे आदी मुद्दे बाहेर आले.
समर्थक व पदाधिकारी एकमेकांना सडेतोड उत्तर देत असतानाच त्यांनी एकमेकांना समोरासमोर भिडण्याचे आव्हान दिले. त्यानुसार सायंकाळी 5 वाजता पालिकेच्या ड प्रभाग कार्यालया समोर दोन्ही गायकवाड एकत्र येऊन सवाल जबाब करणार होते.
शहरातील राजकीय वातावरण तापले असताना त्या पार्श्वभूमीवर कोळसेवाडी पोलीस सतर्क झाले होते. सायंकाळी भाजप आमदार गायकवाड हे समर्थकांसह ड प्रभाग कार्यालय येथे जमले मात्र पोलिसांनी अर्ध्या रस्त्यातच शिंदे गटाचे महेश गायकवाड यांची वाट अडवली.
शिंदे समर्थकांनी घोषणाबाजी करताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी भाजप समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. महेश यांना कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आणून पोलिसांनी त्यांना समज देत नंतर सोडून दिले. यावेळी शिंदे समर्थकांनी घोषणाबाजी केली. यामुळे हा वाद येथेच क्षमणार की वेगळे वळण घेणार हे आता पहावे लागेल.
वरिष्ठांचा यांना वरदहस्त असेल. कारण आपण जर पाहिलं तर एकत्र सत्ता असल्यानंतर एकमेकांच्या विरोधात बोललं जात नाही. परंतु येथे त्यांच्या मनाला वाटत असेल की आपण गद्दारी करतो म्हणून असे वातावरण निर्माण होते. खासदार डॉ. शिंदे यांच्या कानावर मी ही गोष्ट सांगितली होती. पण त्यांनी ते मनावर घेतले नाही. मी गडदारांसोबत समेट करणार नाही. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसोबत राहील पण हे गद्दार सोडून.
- गणपत गायकवाड, आमदार भाजप.
आम्ही युतीचा धर्म पाळतो. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून युतीसाठी आम्ही नेहमी पुढाकार घेतो. मात्र स्थानिक आमदार हे कुठेतरी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना दडपण्याचं काम करतात. ज्या ज्या वेळेला कल्याण पूर्वेचे हिताचं काम असेल लोकप्रतिनिधी काम करत नसेल तर त्याला जाब विचारण्यासाठी आम्ही नक्कीच पुढाकार घेणार.
- महेश गायकवाड, शहरप्रमुख शिंदे गट
दोन्ही गट समोरासमोर आले नाही. कोणताही वाद निर्माण होऊन वातावरण चिघळू नये म्हणून महेश गायकवाड यांना ताब्यात घेण्यात आले होते. दोन्ही गटाची समजूत काढण्यात आली आहे.
- महेंद्र देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोळसेवाडी पोलीस स्टेशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.