डोंबिवली, ता. 17 - कल्याण डोंबिवली पालिकेत शासन सेवेतून पालिकेत आलेले एकूण 21 प्रतिनियुक्तीवरील अधिकारी आहेत. राज्य सेवेतून आलेल्या या अधिकाऱ्यांना पालिकेच्या भौगोलिक क्षेत्राची त्याचबरोबर स्थानिक पातळीवर करायच्या कामाची माहिती नसते. यामुळे सुरुवातीचा कालावधी हे अधिकारी प्रशिक्षण सारखा घालवतात.
त्यांना एकदा माहिती झाली की त्यांची काही दिवसांतच बदली होते. या प्रकारामुळे पालिकेत विकास कामे होत नाही. केडीएमसी ही प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण संस्था आहे का ? असा सवाल करत केडीएमसी मध्ये शासन सेवेतील प्रतिनियुक्तीवरील किती अधिकारी पाठवावेत याचा प्राधान्याने विचार करावा अशी मागणी वजा तक्रार करणारे पत्र शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे.
याविषयी माहिती देताना माजी नगरसेवक राणे म्हणाले, कल्याण डोंबिवली पालिकेत आजच्या घडीला अतिरिक्त आयुक्त ते सहाय्यक आयुक्तांपर्यंत एकूण 21 अधिकारी शासन सेवेतील आहेत. मागील तीन वर्षापासून पालिकेत लोकप्रतिनिधी राजवट नाही. त्यामुळे धोरणात्मक निर्णय, निविदा प्रक्रिया असे अनेक महत्वाचे निर्णय अधिकारी स्वतःच्या मर्जीने घेऊन मनमानी करत आहेत. पालिकेतील स्थानिक अधिकारी निवृत्त झाले आहेत.
या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करायला कोणीही ज्येष्ठ स्थानिक अधिकारी नाही. याऊलट आहे त्या कर्मचाऱ्यांना हे अधिकारी दबावाखाली ठेऊन कामे करून घेत आहेत. या त्रासाला कंटाळून काही निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले कर्मचारी स्वेच्छा निवृत्ती घेत आहेत, असे राणे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
पालिकेत अधिकारी दाद देत नसल्याने नागरिक त्यांच्या समस्या घेऊन माजी नगरसेवकांकडे येतात. नगरसेवकाने अधिकाऱ्यांना संंपर्क केला तर ते टोलवाटोलवीची उत्तरे देतात. राज्याच्या विविध भागातून आलेले प्रतिनियुक्तीवरील अधिकारी आपण येथे दोन वर्षाचे सोबती असल्याने प्रशिक्षण संस्थेसारखा पालिकेचा वापर करतात.
पालिका हद्दीत बेसुमार बेकायदा बांधकामे सुरू आहेत. उच्च न्यायालयाने या बांधकामांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. तरीही पोलीस बंदोबस्ताचे कारण देऊन प्रभागातील प्रतिनियुक्तीवरील अधिकारी या बांधकामांची पाठराखण करत आहेत. पालिकेत दिवसभर बैठे काम असुनही दिमतीला सुरक्षा रक्षक असतात, असे राणे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
पालिकेच्या नगर रचना विभागात अनागोंदी माजली आहे. 15 वर्षाहून अधिक काळ ठराविक अभियंते या विभागात कार्यरत आहेत. हे अभियंते विकासकांशी संधान साधून इमारतीला सवलतीच्या नावाने सरसकट बांधकाम परवानगी देतात. या प्रकारामुळे मागील 10 वर्षात शहरात उभ्या राहिलेल्या अनेक टोलेजंग इमारतींना वाहनतळाची सुविधा नाही. अशा संकुलातील वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने कोंडी होते.
शहर नियोजन करण्याऐवजी शहर भकास करण्याचे काम नगररचना विभागातील काही अभियंते करत आहेत. त्याला शासन सेवेतील अधिकारी साथ देत आहेत. आयुक्त बदली झाला की मागील तारखेच्या बांधकाम परवानगी नस्ती मंजूर करून घेऊन नगररचनेतील अभियंते अराजकतेत भर घालत आहेत. नगररचना कामाचे मागील 10 वर्षाचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश देण्याची मागणी राणे यांनी केली आहे.
सेवा भरती नियमानुसार आवश्यक तेवढेच प्रतिनियुक्तीवरील अधिकारी पालिकेत पाठवावेत, अन्यथा या अधिकाऱ्यांच्या विरूध्द रोष निर्माण होईल, असे राणे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आणले आहे.
माजी नगरसवेक विश्वनाथ राणे शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेत गेल्या अनेक वर्षापासून युतीची सत्ता राहीली आहे. सध्या पालिकेत प्रशासकीय राजवट लागू असल्याने प्रशासकीय अधिकारी माजी लोकप्रतिनिधींना जुमानत नसल्याचे चित्र पालिका स्तरावर आहे. त्यातच आता राणे यां्या या मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कशा पद्धतीने लक्ष घालतात हे पहावे लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.