डोंबिवली : कल्याण शीळ रोड रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या पंधरा गावातील ग्रामस्थांना मोबदला न मिळाल्याने गेले 45 दिवसांपासून भूमिपुत्र कल्याण शीळ रोड लगत धरणे आंदोलन धरुन बसले आहेत. शासनाने अद्यापही याची दखल घेतली नसून दि.बा.पाटील आंदोलन समितीने देखील या भूमिपुत्रांना आपला पाठिंबा दर्शविला आहे. सरकारला जागे करण्यासाठी बाधित भूमिपुत्र गावागावात घरोघरी जात मोहीम राबवित असून सर्व बाधित भूमिपुत्रांना एकत्र येण्याचा सल्ला देत आहेत. येत्या तीन चार दिवसांत जिल्हा प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर जिल्हाधिकारी यांना त्यांच्या कार्यालयात बसू देणार नाही अशी भूमिका या भूमिपुत्रांनी घेतल्याचे पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी सांगितले.
कल्याण शीळ रोडसाठी सुधारीत 561 कोटीचा निधी शासन मंजुर करु शकते परंतू बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळावा याची तरदूत करता येत नाही. सरकार कोणाचेही असो इथल्या भूमिपुत्रांच्या जमिनी केवळ प्रकल्पासाठी वापरायच्या आणि त्यांना मोबदल्या पासून वंचित ठेवणे हेच शासनाकडून सुरु आहे. शासनाचे या भूमिपुत्रांकडे लक्ष वेधण्यासाठी सर्व पक्षीय युवा मोर्चाच्या वतीने कल्याण शीळ रोड लगत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले आहे. गेले 45 दिवस हे आंदोलन सुरु असून शासनाने याची अद्याप दखल घेतलेली नसल्याने भूमिपुत्रांनी आता हे आंदोलन उग्र स्वरुपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
दि.बा.पाटील कृती समिती, ठाकरे समर्थक, कॉंग्रेस, राष्ट्रवादी गटांनी या आंदोलनाला पाठींबा दिला असल्याचे दिसते. शुक्रवारी माजी आमदार सुभाष भोईर, पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड, संतोष केणे, वंडार पाटील, चंद्रकांत ठाणकर यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावत आंदोलनाला उघड पाठींबा जाहीर केला.
उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी भूमिपुत्रांना संबोधित करताना सांगितले की, तुम्ही लढा देत आहात, परंतू यामध्ये केवळ काही लोकच आपल्या छातीवर गोळी झेलण्यास तयार आणि बाकी सगळ्यांना सांभाळून राहतील तर तसे नाही चालणार. सर्व बाधित कुटूंबातील सदस्य या आंदोलनात सहभागी झालेच पाहीजेत.
यासाठी घरोघरी जाऊन तशा स्वरुपाची मोहीम राबवली आहे. असा सल्ला देत जिल्हा प्रशासनाने येत्या पाच दिवसांत या आंदोलनाची दखल घ्यावी अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात बसण्यास मज्जाव करण्यात येईल ही आमची पुढची भूमिका असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. गायकवाड यांच्या या सल्ल्यानंतर युवा मोर्चा सदस्यांनी घरोघरी जात बाधित कुटूंबांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. डायघर गावातून ही सुरुवात झाली आहे.
लोकसभा निवडणुकीची भोईरांनी करुन दिली आठवण...
भूमिपुत्रांना संबोधित करताना माजी आमदार सुभाष भोईर यांनी लोकसभा निवडणुकीच्या आठवणी जागवित भूमिपुत्रांचे डोळे उघड़ण्याचा प्रयत्न केला. भोईर म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या वेळी आगरी समाज आपल्या विरोधात जात असल्याची भावना आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनात आली होती.
त्यावेळी त्यांनी आग्रहाची बैठक भूमिपुत्रांची बोलावित समाजाची मते आपल्यालाच मिळाली पाहीजे असे आग्रहाने सांगितले होते. आम्ही आमचे आगरी बांधव बाबाजी पाटील यांना बाजूला ठेवत त्याठिकाणी मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र यांना मतदान केले होते. त्यावेळी पालकमंत्री असलेले शिंदे आज मुख्यमंत्री आहेत. त्यावेळी ज्या आग्रहाने मत आपल्याला मिळाली पाहीजे असे सांगितले होते, तोच आग्रह आज भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी का करत नाही. खासदारांनी ही जबाबदारी माझी असे सांगत आंदोलन करु नका याचा निर्णय घेतला जाईल असे भूमिपुत्रांना सांगणे अपेक्षित होते. खासदार, आमदार येथील असल्याने आपले काम सोप्पे होईल असे वाटले होते. परंतू असे काही होताना दिसत नाही. समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन हे प्रकल्प सुरु न होता त्यातील बाधितांना मोबदला मिळत आहे. परंतू कल्याण शीळ रोडचे काम सुरु होऊन चार वर्षे उलटली तरी मोबदला मिळत नाही हे वागणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शोभत नाही असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.