शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. कल्याण पूर्वेतून अपक्ष उमेदवारी भरत महेश हे महायुतीचे उमेदवार सुलभा गायकवाड यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तत्पूर्वी त्यांची ही हकालपट्टी कायमची आहे की तात्पुरती आहे याविषयीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
महेश हे खासदार शिंदे यांचे निकटवर्तीय असून ठाकरे गटाकडून ऑफर असताना देखील ते अपक्ष म्हणून उभे राहीले आहेत. महायुतीत भाजपा आणि शिंदे गटात असलेल्या बेबनावामुळे भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी शिंदे गटाचीच ही खेळी आहे का ? असे देखील बोलले जात आहे. महेश याच्यावर आता काय प्रतिक्रीया देतात हे पहावे लागेल.
कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुती मधील भाजपा आणि शिंदे गटातील वाद उघडउघड दिसत आहे. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड हे महेश गायकवाड गोळीबार प्रकरणात जेलमध्ये आहेत. जमिनीच्या झालेल्या वादातून गणपत गायकवाड यांनी हिललाईन पोलिस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने कल्याण पूर्वेतील वातावरण तापू लागले होते व येथील दोन्ही गायकवाडांमधील वाद हे चव्हाट्यावर आले होते.