मुंबई : पालिकेच्या केईएम रुग्णालयात २०१८ नंतरचे पहिले यशस्वी यकृत प्रत्यारोपण झाले. गेली सहा वर्षे येथे यकृत प्रत्यारोपण परवाना नूतनीकरण न झाल्याने बंद होते. मात्र, गेल्या महिन्यापासून यकृत प्रत्यारोपण विभाग सुरू झाला आणि नुकतेच सूरतच्या ११ वर्षीय एका लहान मुलावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात केईएमच्या डॉक्टरांना यश आले.
रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या मुलाला अपस्मारामुळे फिट्स यायच्या. त्यावर औषधोपचार सुरू होते. या औषधांमुळे त्याचे यकृत निकामी झाले होते. त्यानंतर दोन खासगी रुग्णालयात दाखवण्यात आले. तेथील डॉक्टर या मुलांच्या कुटुंबीयांना केईएममध्ये जाण्याचा सल्ला दिला. केईएमचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. आकाश शुक्ला यांनी या मुलाची तपासणी केली. याचसोबत त्याच्या हृदयाचे ठोके कमी असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. डॉ. शुक्ला यांनी अवयव प्रत्यारोपण समितीकडे १६ मार्चला सुपर अर्जंट या गटात नावनोंदणी केली.
त्याचवेळी नवी मुंबई अपोलो रुग्णालयात एका ४२ वर्षीय रुग्णाने अवयवदान केले. या व्यक्तीचे यकृत केईएम रुग्णालयात पाठवण्यात आले. प्रत्यारोपणाचा खर्च कसा करावा, हा प्रश्न कुटुंबीयांना पडाला होता. त्यामुळे डॉ. शुक्ला यांनी अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे आणि केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्याशी चर्चा केली. त्यांनी प्रत्यारोपण करण्यास परवानगी दिली. पैशाची जमवाजमव करण्यात सोशल वर्कर विभागासह अनेकांनी हातभार लावला. अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी सांगितले की, हे प्रत्यारोपण यशस्वी झाले आणि त्याची प्रकृती स्थिर असल्याने डिस्चार्ज देण्यात आला.
रुग्णाच्या कुटुंबीयांकडे केवळ अडीच लाख रुपये होते. केईएम रुग्णालयामध्ये प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठीचा खर्च १० लाखांपर्यंत जाणार होता. मात्र, अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी समाजसेवा विभागाशी संपर्क साधत निधी जमा केला. त्यामुळे या मुलाला जीवदान मिळाले.
- डॉ. आकाश शुक्ला, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, केईएम रुग्णालय
आठ तास शस्त्रक्रिया
यकृत ग्रीन कॉरिडॉरने केईएममध्ये आणले. त्यापूर्वी डॉक्टरांनी चिमुकल्याच्या निकामी यकृताची शस्त्रक्रिया केली आणि नव्या यकृताचे प्रत्यारोपण केले. ही शस्त्रक्रिया आठ तास चालली. यात भूलतज्ज्ञ अमला कुडाळकर, डॉ. चेतन कंथारिया, एचएन रिलायन्समधील डॉ. रवी मोहंका यांनी ही शस्त्रक्रिया केली.
हृदयाचादेखील त्रास
दाखल मुलाला हृदयाचे ठोके अनियमित, हृदयाचे ठोके बंद होण्याचा त्रास जाणवत होता. त्यासाठी हृदयविकारतज्ज्ञ डॉ. अजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पेस मेकर बसवण्याची शस्त्रक्रिया केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.