लॉकडाऊनमुळे रेस्टॉरंट चालक खचले; अनेकांना मानसोपचाराची गरज; पैशांसाठी देणेकरांचा तगादा

लॉकडाऊनमुळे रेस्टॉरंट चालक खचले; अनेकांना मानसोपचाराची गरज; पैशांसाठी देणेकरांचा तगादा
Updated on


मुंबई : गेल्या पाच महिन्यांपासून मुंबईतील रेस्टॉरंट बंद असल्याने संपूर्ण व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे अनेक व्यापारी कर्जबाजारी झाले आहेत. देणेकरांनी पैशासाठी तगादा सुरू केला आहे. त्यात रेस्टॉरंट पुन्हा कधी सुरू होतील याची कल्पना नसल्याने अनेक रेस्टॉरंट चालक प्रचंड तणावात आहेत. त्यामळे काहींना उपचारासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडे न्यावे लागले आहे.

मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मुंबईतील रेस्टॉरंट बंद आहेत. अनलॉक सुरू झाल्यापासून सरकार रेस्टॉरंटला परवानगी देतील, अशी रेस्टॉरंट चालकांना अपेक्षा होती. मात्र, तुर्तास रेस्टॉरंट बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सलग पाच महिने रेस्टॉरंट बंद असल्याने याचा मोठा फटका रेस्टॉरंट चालकांना बसला आहे. अनेक चालक कर्जबाजारी झाले आहेत. काही दिवसांपासून देणेकरांनी पैशांसाठी  रेस्टॉरंट चालकांकडे तगादा लावला आहे. त्यामुळे अनेक चालक-मालक मानसिक दवाबात असल्याची माहिती आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी दिली.

रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी चालकांना कोट्यावधी रूपयांची गुंतवणूक करावी लागते. महिन्याला लाखो रूपयांचा खर्च होतो. मात्र, लाॅकडाऊनमुळे व्यवसायच ठप्प असल्याने चालक प्रचंड मानसिक दबावात आहेत. याच दबावामुळे पुणे आणि सोलापुरात दोन व्यवसायिकांनी आत्महत्या केल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

रेस्टॉरंट चालकांच्या समस्या सोडवण्यासाठी आहार संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या भेटी घेत त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या. अटी-शर्थींसह हॉटेल व्यवसायिकांना परवानगी देण्याची मागणी कऱण्यात आली. सरकारी मदतीची याचलानी करण्यात आली. सरकारकडून आश्वासन मिळाले. मात्र, पुढे काहीही ठोस झाले नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले. 

व्यवसाय 10 टक्क्यांवर
मुंबईतील बहुतांश रेस्टॉरंट हे भाड्याने जागा घेऊन चालवले जातात. एका रेस्टॉरंटसाठी कमीतकमी दीड ते दोन कोटी रूपयांचा खर्च केला जातो. बँकाचे कर्ज सहज उपलब्ध होत नसल्याने यासाठी लागणारे पैसे पगडी किंवा खासगी अर्थपुरवठादाराकडून घेतले जातात. यांचे पैसे वेळेत परत करावे लागतात. मात्र, लॉकडाइनमुळे यात खंड पडला आहे  या व्यवसायात टिकण्यासाठी साधारणत: 70 ते 80 टक्के व्यवसाय होणे गरजेचे असताना व्यवसाय 10 टक्क्यांवर आल्याचे आहार संघटनेचे शिवानंद शेट्टी यांनी सांगितले. 

आहार संघटनेचा पुढाकार
व्यवसायिकांना मानसिक दबावातून बाहेर काढण्यासाठी आहार संघटनेने पुढाकार घेतला आहे. संघटनेकडून व्यवसायिकांसाठी समुपदेशन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही व्यवसायिकांना मानसोपचार तज्ज्ञांच्या उपचारांची गरज आहे. त्यांच्यासाठी मसिना रूग्णालयाशी बोलणी सुरू असून तेथील मानसोपचार तज्ज्ञाकडून व्यावसायिकांवर उपचार करण्यात येणार असल्याचे  आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी सांगितले.

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.