डोंबिवली - आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने "तुमचे एक मत हुकूमशाही उलथवण्यासाठी" असे मतदारांना आवाहन करणारे बॅनर डोंबिवली शहरात लावले आहेत. ठाकरे गटाच्या या बॅनरबाजीवर भाजप व शिवसेनेने त्यांना प्रतिउत्तर दिले आहे.
हुकूमशाही नाही ही विकासशाही असे म्हणत भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी ठाकरे गटाला सणसणीत उत्तर दिले आहे. तर ही माणसं आयुष्यभर हुकूमशाही मार्गाने चालली, यांना लोकशाही कळली नाही असे म्हणत शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी ठाकरे गटाला टोला हाणला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष सतर्क झाले आहे. विकास कामांचा धडाका, त्यासाठी निधीची तरतूद, कामांचे लोकार्पण, धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून पक्षाचा प्रचार राजकीय पक्षांकडून सुरु आहे.
लोकसभा निवडणूकीत भाजपच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी भाजप प्रयत्नशील असून शिंदे गट व अजित पवार गटाकडून देखील आपली ताकद दाखवून देण्यासाठी धडपड सुरु आहे. त्यातच विधानसभेची देखील गणिते पक्षांकडून आखली जात आहेत.
शिवसेना हि एकनाथ शिंदे यांचीच असा निकाल दिल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राज्याच्या राजकारणात काहीसा सक्रिय झालेला दिसला. त्यातही आत्तापर्यंत शांततेच्या भूमिकेत असलेले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः मतदार संघाच्या दौऱ्यावर उतरल्याचे दिसून आले आहे.
संपर्क अभियानाच्या माध्यमातून त्यांनी पहिलाच दौरा राज्यात केला. तोही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र असलेले खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदार संघात. यानंतर ठाकरे गटाकडून डोंबिवली शहरात बॅनर बाजी करण्यात आली असून यातून मतदारांना त्यांनी आवाहन केले असल्याचे दिसुन येत आहे.
मतदार राजा 'हे मतदान तुझं शेवटचं मतदान ठरु नये...तुझं एक मत 'हुकूमशाही' उलथविण्यासाठी'' अशा आशयाचे बॅनर डोंबिवली शहरातील चौका चौकात लावले आहेत. ठाकरे गटाच्या या बॅनर बाजीवरून आता भाजप व शिवसेनेने त्यांना लक्ष करत त्यांच्यावर टीका केली आहे.
भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड याविषयी म्हणाले, लोकांनी विकासाला बघून मतदान केलेले आहे आणि देशाचा विकास होत आहे. इथे कोणतीही हुकूमशाही नाही. बाबासाहेब आंबेडकर यांच संविधान आहे
आणि त्या संविधानाच्या अखत्यारित राहूनच सर्व कायद्याची कामं केली जातात. त्यामुळे हुकूमशाहीचा प्रश्नच येत नाही. सर्वसामान्याना न्याय भेटतो. देशाचा विकास होतो. आणि ही हुकूमशाही नाही तर विकास शाही आहे असे ते म्हणाले.
तर शिवसेना शिंदे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे म्हणाले, जी माणसं आयुष्यभर हुकूमशाहीच्या मार्गाने चालली ते काय लोकांना सांगणार की हुकूमशाही उलथवण्यासाठी मतदान करा. यांना आयुष्यभर लोकशाही कळली नाही
आणि आता लोकशाहीच्या मार्गाने भारतीय जनता पार्टी व शिवसेना पक्ष चालत असेल आणि ते सांगतात की लोकशाही पद्धतीने मतदान करा. पहिले स्वतःच सुधरवायला घ्या, नंतर दुसऱ्याला ज्ञान द्याव. म्हणून त्यांनी आम्हालाही सांगू नये आणि नागरिकांनाही सांगू नये असे मोरे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.