ब्रेकिंग : गृहविभागाच्या 31 डिसेंबर आणि नववर्षासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी

ब्रेकिंग : गृहविभागाच्या 31 डिसेंबर आणि नववर्षासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी
Updated on

मुंबई, ता. 28 : मदत व पुनर्वसन विभागाने एका आदेशान्वये राज्यात  दि. 22 डिसेंबर,2020 ते   5 जानेवारी, 2021 या कालावधीत रात्री 11.00 ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. कोविड -19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता 31 डिसेंबर 2020 व नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.

  1. कोरोनाच्या अनुषंगाने दि.31 डिसेंबर 2020 रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व दि. 1 जानेवारी 2021 रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे.
  2. 31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्रकिनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
  3. विशेषत: मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये देखील अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते त्या दृष्टीने कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.
  4. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.
  5. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.
  6. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.
  7. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.
  8. कोविड-19 या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पूनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलिस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.

तसेच या परिपत्रकानंतर 31 डिसेंबर 2020 व नूतन वर्ष सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे. अशा सूचना गृह विभागामार्फत देण्यात आल्या असून नागरिकांनी यांचे पालन करावे, असे आवाहन गृह विभागामार्फत करण्यात आले आहे.

maharashtra home department issued guideline for thirty first December and new year party

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.