#RepublicDay2020 : कान्होजी आंग्रे यांची शौर्यगाथा सांगणारा चित्ररथ शिवाजी पार्कवरील संचलनात

#RepublicDay2020 : कान्होजी आंग्रे यांची शौर्यगाथा सांगणारा चित्ररथ शिवाजी पार्कवरील संचलनात
Updated on

मुंबई - प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावरील संचलनात सहभागी होऊ न शकलेला महाराष्ट्राचा चित्ररथ आता शिवाजी पार्क येथील संचलनात सहभागी होणार आहे. "स्वराज्याचे सरखेल दर्यासारंग - कान्होजी आंग्रे' या विषयावर हा चित्ररथ साकारण्यात आला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आरमार उभारले. स्वराज्याच्या सीमा समुद्रापर्यंत पोहोचवल्या आणि नौसेनेचे महत्त्व अधोरेखित केले. शिवरायांनी पहिल्यांदाच समुद्री सैनिकांची तुकडी निर्माण केली. गुराब, गलबते, तरांडे, तारू, शिबाड, मचवा, पगार, वाघोर अशा नौकांची निर्मिती केली. छत्रपती संभाजी महाराज यांनीही सिद्दी, डच, पोर्तुगीज यांना शह देण्यासाठी आरमाराचा विस्तार केला. छत्रपतींच्या या आरमार उभारणीत अनेक वीरांनी योगदान दिले; त्यापैकी एक म्हणजे कान्होजी आंग्रे. कान्होजी आंग्रे यांची शौर्यगाथा सांगणारा चित्ररथ प्रसिद्ध कलादिग्दर्शक चंद्रकांत देसाई यांनी साकारला आहे. 

स्वराज्याची सेवा करताना कान्होजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली सागरात भगवे तोरण कसे दिमाखाने फडकू लागले, त्यांनी इंग्रज, डच आणि फ्रेंच यांच्यावर समुद्रावरून कसे नियंत्रण ठेवले याची शौर्यगाथा चित्ररथात उलगडून दाखवण्यात आली आहे. चित्ररथात जहाजावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारुढ पुतळा उभारण्यात आला असून, कान्होजी आंग्रे यांच्या कार्याची माहिती देणारा जिवंत देखावा साकारण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्कवर होणाऱ्या संचलनात अनेक नामवंत कलाकार सहभागी होतील. नागरिकांना लाठ्या-काठ्या, तलवारबाजी यांची प्रात्यक्षिकेही पाहता येतील. 

आरमार शिवबाचे! 
"लाटेवर स्वार होऊन, तुफानाचा वारा पिऊन, घडले हे आरमार शिवबाचे. हातावर शीर घेऊन, स्वराज्याचे लेणे लेऊन, लढले हे सरदार दर्याचे'' असे सरखेल दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांच्या कर्तृत्वाचे वर्णन केले जाते. त्यांनी सुरतपासून कोचीनपर्यंत पसरलेल्या अथांग दर्याचा सेनापती, मराठा साम्राज्याचा पहिला नौसेनापती म्हणून अतिशय धोरणीपणाने आणि मुत्सद्देगिरीने सागरी तटावर कर्तव्य बजावले होते. कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग या ठिकाणी सुधारित जहाजबांधणी, शस्त्रनिर्मितीची भरीव कामगिरी केली होती. दर्यासारंग कान्होजी यांच्या परवानगीशिवाय समुद्रावर कोणीही कोणतीही हालचाल करू शकत नव्हते. सागरी व्यापाऱ्यांवरही त्यांचे नियंत्रण होते. अनेक सागरी मोहिमा काढून त्यांनी इंग्रजांना जेरीस आणले होते. 

maharashtra tableau will participate in republic day parade in mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.