मुंबई: देशभरात राबवण्यात येणाऱ्या लसीकरण मोहीमेला चालना देण्याच्या उद्देशाने राज्यातील काही महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय अगदी काही दिवसांपूर्वीच घेतला. १६ जानेवारीपासून आतापर्यंत लसीकरणाला हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला. लसीकरणाबाबत अपेक्षित जागरूकता न झाल्यामुळे आणि काही गैरसमजुतींमुळे या मोहिमेला मुंबईत अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे आता १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना सरसकट लस देण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. अशातच, राज्यात आतापर्यंत एकूण किती लोकांनी लस घेतली? याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. त्याबद्दल आरोग्य विभागाने सविस्तर माहिती दिली.
राज्यात आतापर्यंत एकूण ५७ लाख ६२ हजार ६०१ लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने रविवारी दिली. शनिवारच्या एका दिवसा तब्बल २ लाख ३१ हजार २७७ जणांना लस देण्यात आल्याचेही त्याने सांगितले. आतापर्यंत राज्यात आरोग्यसेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी ९ लाख ७८ हजार ३९१ लोकांना पहिला डोस तर ४ लाख ६९ हजार ३५४ लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
फ्रंटलाइन वर्कर्सची आकडेवारी पाहता त्यांच्यापैकी ८ लाख १८ हजार २६७ जणांना पहिला डोस तर २ लाख ४७ हजार ५९६ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ४० ते ६० या वयोगटातील को-मॉर्बिलीटी म्हणजे असाध्य आजार असणाऱ्या एकूण ६ लाख १९ हजार १९ जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर २६ लाख २९ हजार ९७४ ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.
आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कोविड टास्क फोर्समधील पदाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एक बैठक रविवारी पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना लॉक़डाउनच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश दिले. जर कोरोनाला रोखण्यासाठी ठरवून दिलेल्या नियमांचे नागरिकांकडून अशाचप्रकारे उल्लंघन होत राहिले, तर राज्यात लॉकडाउन सदृश निर्बंध लादावेच लागतील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.