मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टरांनी कोरोना संसर्गाच्या सबबीखाली खटल्यास गैरहजर राहण्याची परवानगी मागितली आहे. मात्र हा निव्वळ बनाव असल्याचा आरोप मुंबई पोलिसांच्या वतीने विशेष न्यायालयात करण्यात आला आहे.
आरोपी डॉ. हेमा अहुजाने विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. सध्या न्यायालयात आरोपींच्या विविध अर्जावर सुनावणी सुरू आहे. अद्यापही खटला सुरू झाला नाही, त्यामुळे न्यायालयात सुनावणीला अनुपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी हेमा यांनी केली आहे. मात्र या मागणीला सरकारी वकील प्रदीप घरत यांनी लेखी खुलासाद्वारे विरोध केला आहे. सध्या टोपीवाला वैद्यकीय महाविद्यालयात हेमा कोविड कर्तव्यावर आहे. रुग्णालयात काम करायचे आहे ही आरोपीने दिलेली सबब निव्वळ धूळफेक आहे. लॉकडाऊनमध्ये जेव्हा डॉक्टरांची अत्यंत गरज होती. तेव्हा आरोपी अहुजा मुंबईत नव्हत्या. तेव्हा मुंबईत डॉक्टर म्हणून माझी गरज आहे किंवा मला रुग्णांची सेवा करायची आहे, अशी भूमिका तेव्हा त्यांनी घेतली नाही. मात्र आता पदव्युत्तर अभ्यासाचे कारण त्या देत आहे, अशा शब्दांत पोलिसांनी विरोध केला आहे.
पायलच्या आईचाही अर्जास विरोध
अहुजा यांच्यासह भक्ती मेहेर आणि अंकिता खंडेलवाल यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. तिघींनाही पुढील शिक्षणासाठी परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली असून, न्यायालयात हजेरी लावण्याचे निर्देशही दिले आहेत. मागील वर्षी मेमध्ये पायलने वसतिगृहातील खोलीमध्ये आत्महत्या केली होती. आरोपींनी जातीवाचक शेरेबाजी करुन तिचा छळ केल्यामुळे तिने आत्महत्या केली असा आरोप तिच्या आईने केला आहे. पायलच्या आईनेही या अर्जाला विरोध केला आहे.
-----------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.