ठाणे : मुंबई-ठाण्यासारख्या महानगरांमध्ये इंच इंच जागेला सोन्याचे मोल आहे. अनेकांना घरासमोर बाग हवी असते, तर काहींना निसर्गाच्या सानिध्यात निवारा हवा असतो. घर कितीही मोठे असले तरी जागा कमीच पडते. असे असतानाही ठाण्यातील 60 वर्षीय वृद्ध पर्यावरणप्रेमी विजयकुमार कट्टी यांनी स्वतःच्या घरातच भलीमोठी बाग फुलवली आहे. गॅलरीत फळ-फुलांच्या झाडांचे किचन गार्डन, तर बेडरुममध्ये तब्बल पावणेतीनशे रोपट्यांची जोपासना त्यांनी केली आहे.
ठाण्यातील बाळकुम परिसरातील बहुमजली इमारतीत 28 व्या मजल्यावर पूर्व-पश्चिम दिशेच्या घरात पत्नी व मुलासोबत विजयकुमार कट्टी राहतात. गेली अनेक वर्षे ते तरुणांना लाजवेल असे पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त शहरे यावर काम करत आहेत. आतापर्यंत घराच्या गॅलरीमध्ये किंवा किचनमध्ये झाडे लावलेली पाहिली असतील, पण कट्टी यांनी चक्क आपल्या बेडरुम आणि गॅलरीमध्ये भलीमोठी बाग तयार केली आहे.
या बागेत 275 छोटी-मोठी फुलांची, सुगंधी, औषधी, मनिप्लांट अशी निरनिराळ्या प्रकारची झाडे लावली आहेत. मनिप्लांटच्या 17 पैकी 6 प्रजाती कट्टी यांच्या घरात आहेत. ते बेडरुममध्ये असलेल्या बागेत झाडांना खतपाणी वगैरे टाकून वेळच्या वेळी त्यांची देखभाल करतात.
गेल्या 18 महिन्यांपासून ते एक-एक झाड जमवून कुंड्यांमध्ये लावत आहेत आणि या कुंड्या पण टाकाऊ प्लास्टिकपासून तयार केल्या आहेत. नागरिकांनी रस्त्यावर फेकलेल्या झाडांच्या फांद्या किंवा झाड कटिंग करून त्याच ठिकाणी टाकलेल्या फांद्या जमवून ते घरी घेऊन आणून घरातीत बागेत लावतात.
लॉकडाऊन काळात अनेकांनी आपला वेळ इतर कामांसाठी व्यर्थ घालवला असेल; पण कट्टी यांनी चक्क झाडे जमवून घरातच बाग फुलवली. कट्टी यांच्या या उपक्रमाची कीर्ती सातासमुद्रापार पसरली असून समाजात पर्यावरणप्रेमाचे बीज अंकुरावे यासाठी ऑनलाईन सेमिनार घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
प्रदूषण वाढले अशी टीका करण्यापेक्षा प्रत्येकानेच झाडे लावून ती जगवल्यास निसर्गाचा ऱ्हास थांबण्यास मदत होईल. सूर्य प्रकाशाची गरज नसलेल्या प्रजातीतील अनेक झाडे आहेत. त्यांची लागवड घरात करता येते. घरी असल्यावर निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यासारखे वाटते. सकाळी झोपेतून उठल्यावर निसर्गाच्या कवेत मन अगदी प्रसन्न होते. त्यामुळेच या कोरोनाच्या काळात ताण-तणावमुक्त जीवन जगता आले.
- विजयकुमार कट्टी, पर्यावरणप्रेमी
------------------
(संपादन : प्रणीत पवार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.