"...म्हणूनच राज्य सरकारला कापरं भरलं"; भाजपा नेत्याचा टोला

"...म्हणूनच राज्य सरकारला कापरं भरलं"; भाजपा नेत्याचा टोला
Updated on

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर एका गाडीत काही स्फोटकं आढळून आली होती. स्कॉर्पियो कारमध्ये ही स्फोटके आढळली होती. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा काही दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला. या मृत्यू प्रकरणावरुन मंगळवारी विधानसभेत बराच गोंधळ आणि आरोप-प्रत्यारोप झाले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून ठाकरे सरकारवर टीका केली. तसेच, हिरेन यांच्या पत्नीने व्यक्त केलेल्या संशयाचा दाखला देत सचिन वाझे यांनीच हिरेन यांची हत्या केल्याचा दावा केला आणि वाझे यांना तत्काळ निलंबित करण्यात यावं, अशी मागणीही फडणवीस यांनी केली. याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला.

अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडल्यानंतर त्या प्रकरणाचा तपास सुरूवातीला एटीएस (दहशतवाद विरोधी पथक) करेल असं सांगण्यात आलं होतं. पण गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर अखेर हा तपास 'राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे' (NIA) सोपवण्यात आला. या प्रकरणाबाबत अतुल भातखळकर यांनी ट्वीट केलं. "पत्नीच्या संशयानुसार मनसुख हिरेन यांची सचिन वाझेंकडून हत्या असा आरोप विधानसभेत देवेंद्रजींनी केला आहे. तरीच NIA या प्रकरणाची चौकशी करणार म्हटल्याबरोबर राज्य सरकारला कापरं भरलं होतं...", असं ट्वीट करत त्यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला.

सचिन वाझे यांनी मनसुख हिरेन यांची हत्या केली आहे असा दावा हिरेन यांच्या पत्नीने केला आहे. या मुद्द्यावरून सभागृहात देवेंद्र फडवणीस विरूद्ध राज्य सरकार अशी शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. सचिन वाझे यांचा अंबानी यांच्या घरासमोर आढळलेल्या कारशी काय संबंध आहे? त्यांना या कारबद्दलची माहिती कुठून मिळाली? मनसुख हिरेन यांच्याशी सचिन वाझे का संपर्कात होते? सचिन वाझे यांनी हिरेन प्रकरणात इतका रस घेण्याचे कारण काय? असे विविध सवाल फडवणीस यांनी गेल्या काही काळात उपस्थित केले आहेत. तर सचिन वाझे यांनी पत्रकार अर्णब गोस्वामी यांना घरातून अटक केली होती. त्यामुळे भाजपाची नेतेमंडळी सचिन वाझे यांच्यावर खार खाऊन आरोप करत असल्याचा प्रतिहल्ला राज्य सरकारमधील काही मंत्र्यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबल्याचा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख आणि शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केला. तसेच, वाझेंनी अर्णब गोस्वामी यांना घरातून अटक केल्याचं भाजपा नेत्यांना दु:ख झालं आहे आणि म्हणूनच सचिन वाझे यांच्यावर कारवाईची मागणी भाजपाकडून केली जात आहे अशी टीका राज्य सरकारच्या काही नेत्यांनी केली.

Mansukh Hiren Sachin Waze Case BJP Leader Atul Bhatkhalkar slam Uddhav Thackeray Government 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.