नवी मुंबई : कोरोना रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिका आणि सिडको अधिकारी व्यग्र आहेत. साहजिकच त्याचाच फायदा घेत संधीसाधू भूमाफिया सक्रिय झाले आहेत. ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे आदी परिसरात तब्बल ४०० पेक्षा अधिक अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या आहेत. चार मजली इमारतींसोबतच चाळींचाही त्यात समावेश आहे. विशेषत: खाडीकिनारे आणि गावठाणात असे इमले रचले जात असून कायदे आणि नियम पायदळी तुडवून बांधकामे होत असल्याने महाडसारखी दुर्घटना नवी मुंबईत घडण्याचा धोका आहे.
राज्यभरात चर्चा झालेल्या दिघा अनधिकृत बांधकाम प्रकरणानंतर नवी मुंबईसारख्या स्मार्ट सिटीतील भूमाफियांचे जाळे किती खोलवर आहे, हे चव्हाट्यावर आले होते. उच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे या भागातील ११० अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानंतर हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून सिडकोने २०१५ मध्ये न्यायालयात स्वतःहून ४९८ अनधिकृत बांधकामे असल्याची कबुली दिली. त्यानंतर न्यायालयाने सर्वच प्राधिकरणांना संपूर्ण नवी मुंबईचा सर्व्हे करून एका वर्षात अनधिकृत इमारतींचा लेखाजोखा मांडण्याचे आदेश दिले होते. त्याची मुदत ४ नोव्हेंबर २०१९ रोजी संपली आहे.
तसेच दर चार महिन्यांनी कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले होते; परंतु न्यायालयाच्या या आदेशाप्रमाणे अनधिकृत इमारती आणि दर चार महिन्यांनी त्या पाडण्याच्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचा सिडको आणि महापालिका प्रशासनाला विसर पडला आहे. कोरोनामुळे आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अनधिकृत बाधकामांची आढावा घेणारी बैठकही झालेली नाही. त्यामुळे शहरात सध्या किती अनधिकृत बांधकामे सुरू आहेत, याकडे प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केले असून कोरोना काळात ४०० पेक्षा अधिक बेकायदा इमारतींची कामे झाली आहेत. सिडकोच्या नियोजनातून सुटलेल्या आणि गावाच्या आजूबाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर कच्चे बांधकाम करण्यात येते. त्यानंतर ते पक्के केले जाते. ही कामे रात्री करण्यात येतात. त्यानंतर ती भाड्याने देऊन कमाई केली जाते.
दहा हजार अनधिकृत बांधकामे
लाखो रुपयांचा आशीर्वाद?
सिडको व नवी मुंबई महापालिकेतर्फे अनधिकृत बांधकामांना नोटीस बजावण्याचे काम केले जाते; मात्र पुढे कारवाई होत नाही. कारवाई होऊ नये म्हणून इमारतींच्या मजल्यानुसार मलिदा ठरवला जातो, असे समजते. मजल्यानुसार तो वाढतो. कारवाई केली जाऊ नये म्हणून स्थानिक पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनाही लाभ होतो. बेकायदा बांधकामांविरोधात दिघा बेकायदा बांधकाम प्रकरणातील याचिकाकर्ते राजीव मिश्रा यांनी महापालिकेकडे तक्रार केली आहे.
अनधिकृत बांधकामे असलेले ठिकाणे
चाळी : चिंचपाडा, यादवनगर, आडवली-भुतवली, महापे, पावणे, तुर्भे एमआयडीसी, ऐरोली खाडी परिसर, गोठिवली खाडी परिसर, तळवली-घणसोली खाडी परिसर आणि कोपरखैरणे खाडी परिसर
चार मजली इमारती : घणसोली, गोठिवली, दिवा गाव, कोपरी, खैरणे, बोनकोडे, कोपरखैरणे, नेरूळ, शिरवणे, तुर्भे आणि महापे
नवी मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका यंत्रणा त्या कामात व्यग्र आहेत. त्यामुळे दुर्लक्ष होऊन अनधिकृत बांधकामे वाढली असतील; परंतु विभाग अधिकारी वेळोवेळी नोटीस बजावत आहेत. पावसाळा संपल्यानंतर तात्काळ बेकायदा बांधकामांवर एका मोठ्या मोहिमेद्वारे कारवाई केली जाईल.
- अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका
----
संपादन ः ऋषिराज तायडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.