ठाण्यातील 206 ग्रामपंचायतीत कोरोनामुक्तीचा हिरवा झेंडा; 45 गावांमध्ये कोरोनाचा शिरकावही नाही

ठाण्यातील 206 ग्रामपंचायतीत कोरोनामुक्तीचा हिरवा झेंडा; 45 गावांमध्ये कोरोनाचा शिरकावही नाही
Updated on

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींमध्ये 28 दिवसांत एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही, अशा ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात हिरवा झेंडा लावणार असल्याचे जिल्हा परिषदेकडून जाहीर करण्यात आले होते. त्याला ग्रामपंचायतींनीही सकारात्मक प्रतिसाद देत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या. परिणामी जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांमधील 206 ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या क्षेत्रात हिरवा झेंडा लावण्यात आला आहे. दुसरीकडे, 45 गावांमध्ये अद्याप कोरोनाचा शिरकावच झाला नसल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे. 

कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने अनेक उपाययोजना राबवल्या. रुग्ण आढळताच संबंधित परिसर 14 दिवस प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करणे, घरोघरी जाऊन सर्वेक्षण, जनजागृती करणे, खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना क्वारंटाईन सेंटर, फिव्हर क्‍लिनिक, अँटीजन चाचणी याठिकाणी सेवा देण्यासाठी प्रवृत्त करणे अशा उपाययोजनांमुळे ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांचा शोध घेणे व त्यांच्यावर उपचार करणे सोपे झाले. तरी कोरोना पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते आणि उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रामीण) चंद्रकांत पवार यांनी ग्राम पंचायतीच्या क्षेत्रात तसेच गावात हिरवा झेंडा लावण्याची नवी युक्ती लढवली. त्याला ग्रामपंचायतींनीही प्रतिसाद दिल्याने ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 430 ग्रामपंचायतींपैकी 206 ग्रामपंचायतींमधून कोरोना आता हद्दपार झाला आहे. यामध्ये मुरबाड तालुक्‍यातील सर्वाधिक 25, शहापूरमधील 16, अंबरनाथमधील 3 आणि भिवंडीतील एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे. 

ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केला. नंतर अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या तालुक्‍यांमध्ये रोज शंभरहून अधिक रुग्ण आढळून येत होते. यामुळे या भागातील एकुण करोनाबाधितांची संख्या आठ हजार 102 तर, मृतांची संख्या 276 वर पोहोचली आहे. त्यामुळे हा संसर्ग ग्रामीण भागातही पसरण्याचा धोका होता. मात्र, जिल्हा परिषद प्रशासन व आरोग्य विभागाने वेळीच हा धोका ओळखत पावले उचलल्याने हा धोका आता टळला आहे. तरी, नागरिकांनी सावधानता बाळगत सरकारच्या सर्व सुचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

आशा सेविकांची मोलाची कामगिरी 
ग्रामीण भागात आशा व अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जात नागरिकांना कोरोना आजाराचे गांभीर्य व त्याचे परिणाम याबाबत लोकांना माहिती दिली. तसेच, संसर्गापासून बचाव व्हावा यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबतही जनजागृती केली. याचा फायदा ग्रामीण भागात होताना दिसत आहे. या व्यापक जनजागृतीमुळे ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.

Many villages in Thane district are free from corona infection

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.