मुंबई : यंदाची निवडणूक तशी विशेष आहे. तशा प्रत्येक निवडणुका या विशेषच असतात. कारण या निवडणुकांच्या माध्यमातून अगदी गावापासून ते देशाचा विकास होणार असतो. निवडून आलेले नेते विकास करतात का ? तर हा चर्चेचा विषय आहे. सत्तेत असणारे म्हणतात, आम्ही विकास केला; तर विरोधक म्हणतात सत्ताधाऱ्यांनी लुटलं. वाद-प्रतिवाद होत असतात. प्रतिवाद करण्यासाठी प्रतिस्पर्धी असावा लागतो. मात्र यंदाची निवडणूक ही प्रतिस्पर्धी नसलेलीच आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि याच अर्थाने प्रतिस्पर्धी नसणारी ही निवडणूक विशेष आहे.
नेत्याचं पक्षांतर आणि वरळीतील गणित :
कोल्हापूर, सातारा आणि सांगलीमध्ये पूर आला तेव्हा आयर्विन पुलावरून एका व्यक्तीनं मारलेली विमान उडी चांगलीच चर्चिली गेली. मात्र नेत्यांच्या उड्या विमान उडीलाही लाजवतील अशाच होत्या. अशीच एक रातोरात उडी मारली ती वरळीचे राष्ट्रवादीचे माजी आमदार सचिन भाऊ आहिर यांनी. निवडणुकीच्या साधारण दोन महिने आधी त्यांना जणू विकासाचं स्वप्न पडलं आणि रातोरात मनगटाचं घड्याळ उतरवलं आणि शिवबंधन बांधलं. याच काळात वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना शिवसेना उमेदवारी देणार असल्याच्या बातम्या माध्यमात येऊ लागल्या होत्या. सचिन आहिर यांचं राष्ट्रवादीतून आदित्य यांना कडवं आव्हान निर्माण झालं असतं; पण आहिर यांच्या म्हणण्यानुसार ते आदित्य यांच्या विचाराने भारावले होते. आदित्य यांचे भारावलेले विचार ऐकून पक्षांतर केल्याचंही आहिर यांनी बोलून दाखवलं .
शिवसेनेचा बालेकिल्ला :
मुळात वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला. तिथले सर्व नगरसेवक हे शिवसेनेचे. २०१४ ला याच मतदारसंघातून सुनिल शिंदे आमदारही झाले. २००९ च्या निवडणुकीत मनसेनं वरळीत पोटभर मतं खाल्ल्यामुळं आहिर यांचा राष्ट्रवादीतून विजय झाला होता. या अगोदर म्हणजे १९९० पासून येथे सेनेचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय दत्ताजी नलावडे हेच आमदार होते. त्यामुळं हा मतदारसंघ शिवसेनेसाठी तसा नवा नाही.
शिवसेनेची बदलणारी भूमिका :
फक्त समाजकारणच करणार अशी भूमिका घेत मध्यमवर्गीय कुटुंबातून एक मराठी नेतृत्व ६०च्या दशकात पुढं आलं ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. मराठी नेत्यांची मोट बांधली आंदोलन केली. तत्कालीन सामान्य माणसाचा आवाज बनली ती शिवसेना. पुढे सेनेनं प्रजा समाजवादी पक्षासोबत युती केली. मुंबई मनपाची निवडणूक लढवली आणि यश संपादन केलं. सत्तेची चटक सेनेला लागली. भूमिका बदलली ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण अशी बाळासाहेबांनी भूमिका घेतली. मराठीचा मुद्दा पुढं रेटत सेना वाढत होती. पण बाळासाहेबांनी निवडणूक लढवली नाही. रिमोट स्वत:कडे ठेवला. पुढे उद्धव ठाकरे यांच्याकडे सेनेची सूत्रं गेली. त्यांनीही निवडणूक लढवली नाही. आता आदित्य रिंगणात उतरलेत, भूमिका बदललीय. १०० टक्के राजकारणच करणार अशी आता भूमिका झालीय.
वरळीतील राजकीय मॅनेजमेंट :
२०१४ पंचवार्षिक पासून राजकीय मॅनेजमेंट हे शब्द सतत कानावर पडतायत. यात प्रामुख्यानं नाव समोर येतं ते प्रशांत किशोर यांचं. प्रशांत किशोर आणि त्यांची टीम सध्या आदित्यसोबत आहे. वरळीत प्रचार सुरूंय, पण नेमकं कोणाला हरवण्यासाठी हेच उमगत नाही. निवडणुकीच्यापूर्वी मुख्य विरोधकच सेनेत गेला. सेनेचे विद्यमान आमदार सुनिल शिंदे हे युवराजांविरोधात बंड करू शकत नाहीत. मनसेचं पुतण्यावरचं प्रेम उफाळून आलंय म्हणून मनसेचा उमेदवारच नाही. मग मनसे वरळीत कोणाच्या मागे उभी राहणार हे वेगळं सांगायला नको. राहिला प्रश्न आघाडीचा. वरळीची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातली. त्यामुळं सध्या या जागेवर उमेदवार म्हणून डॉ. सुरेश माने लढत आहेत. सुरेश माने तसे मूळचे बसपाचे. बसपाची मुलूख मैदानी तोफ होती. तत्कालीन नेत्यांसोबत वाद झाल्यानं त्यांनी सवतासुभा निर्माण केला. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीची स्थापना केली. समाधानकारक यश संपादन करु शकले नाहीत. राजकीय ताकद वाढवायची याच हेतूनं त्यांनी मोकळ्या झालेल्या वरळी विधानसभेच्या जागेची चाचपणी केली. बोलणी झाली आणि ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर मैदानात उतरले. आता वरळीकर त्यांना स्वीकारतील का ? याचं उत्तर मिळायला अवकाश आहे. वंचितची फार मोठी ताकद वरळीत नाही. त्यांचं आदित्यसाठीचं आव्हान शून्य आहे. त्यामुळं 'एकटाच धावलो आणि पहिला आलो..' अशीच गत वरळीत दिसून येतेय.
WebTitle : Shivsena Aaitya thackeray and worli constituency
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.