ठाणे: कोरोनाच्या आपत्तीत एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात केवळ सुमारे तीनशे रुग्णसंख्या असताना दररोज आठशे माणसांच्या जेवणावळीचे बील काढण्यात आल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी केला होता. मात्र पालिकेने जी बिले काढली आहेत, ती नियमानुसारच काढली असल्याचा दावा महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केला आहे.
आयसीएमआरच्या निर्देशानुसारच प्रत्येक रुग्णामागे किती स्टाफ गरजेचा असतो, त्याची माहिती आरोप करणाऱ्या नगरसेवकांना माहित नसावी असेही त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या काळात शहरातील विविध भागात मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून क्वारंटाईन केंद्रे उभारण्यास सुरूवात झाली होती. या केंद्रात दाखल झालेले रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना चहा, नास्ता, दोन्ही वेळचे जेवण पुरविण्यासाठी 280 रुपयांचे पॅकेज मंजूर करण्यात आले होते. ठाणे महापालिका हद्दीत 15 एप्रिलला रुग्णांची संख्या 110 होती. तर 30 एप्रिलला रुग्णसंख्या 310 पर्यंत पोहोचली होती. मात्र 15 एप्रिल ते 30 एप्रिल या काळात क्वारंटाईन केंद्रातील रुग्ण, वैद्यकीय आणि महापालिकेतील कर्मचारी आदींना सुमारे 800 जणांना जेवण दिल्याचे बिल आकारण्यात आले आहे.
या बिलापोटी महापालिकेकडून 33 लाख 65 हजारांचे बिल मंजूर करण्यात आले असल्याचा आरोप नगरसेवक पवार यांनी केला होता. मात्र नगरसेवकानी आरोप करताना केवळ रुग्णाची संख्या केवळ लक्षात घेतली आहे. मात्र त्या रुग्णांची सेवा करण्यासाठी आरसीएमआरच्या निर्देशानुसार प्रत्येक रुग्णामागे स्टाफची संख्या किती असावी लागते याची माहिती आरोप करणाऱ्यांनी कदाचित घेतली नसावी असे आयुक्तांनी सांगितले.
एक रुग्ण असला किंवा शंभर रुग्ण असले तरी त्याठिकाणी साफसफाई, वैद्यकीय कर्मचारी, अधिकारी, इतर स्टाफ यांचेही जेवण त्याच ठिकाणी दिले जात होते. त्याचाच हा खर्च लावण्यात आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एवढेच नव्हे तर जिल्हयातील इतर महापालिकांच्या तुलनेत ठाणे महापालिकेकडून एका जेवणाच्या ताटामागे 280 रुपये आकारले जात आहेत. ते कमी असून यामध्ये तर रुग्णांना दूध आणि अंडी यांचाही त्याच जेवणाच्या ताटामध्ये समावेश आहे. इतर महापालिका 300 ते 450 रुपये दराने जेवण देत आहेत. मात्र पालिकेने त्या ठिकाणी देखील बचतच केलेली असल्याचा दावा आयुक्त शर्मा यांनी केला आहे.
----------------------------
(संपादनः पूजा विचारे)
Meal bill quarantine center Thane as per rules TMC reply BJP allegation
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.