Metro Journey : मेट्रोतील गारेगार प्रवासाला पसंती! सहा महिन्यांत १९ लाख नागरिकांनी केली सफर

नवी मुंबई मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांत मेट्रोतून १९ लाख ६२ हजारांहून अधिक नागरिकांनी प्रवास केला आहे.
Mumbai Metro
Mumbai Metrosakal
Updated on

नवी मुंबई - नवी मुंबई मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांत मेट्रोतून १९ लाख ६२ हजारांहून अधिक नागरिकांनी प्रवास केला आहे. नवी मुंबई मेट्रोच्या प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र या मार्गावरील अपुऱ्या सुविधांमुळे नियमित प्रवासी त्रस्त झाले आहेत. मेट्रोने मासिक पास, रिटर्न तिकीट व इतर सोयी सुविधा सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

तळोजा नोडमधील नागरिकांना यापूर्वी रिक्षा, एनएमएमटी बस आणि इको व्हॅन आदी वाहनांतून तळोजा ते बेलापूर असा प्रवास करावा लागत होता. मात्र नवी मुंबई मेट्रो सुरू झाल्यामुळे तळोजा व खारघरमधील नागरिकांना अवघ्या १५ मिनिटांत कोणत्याही अडथळ्याविना बेलापूर ते तळोजा असा प्रवास करणे शक्य झाले आहे. त्यामुळे मेट्रोला नागरिकांकडून पसंती मिळत आहे.

नवी मुंबई मेट्रो मार्गावरून नोव्हेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ या सहा महिन्यांमध्ये तब्बल १९ लाख ६२ हजारांहून अधिक नागरिकांनी प्रवास केल्याची आकडेवारी सिडकोने नुकतीच प्रसिद्ध केली आहे. प्रवाशांकडून मेट्रो सेवेला उत्तम प्रतिसाद मिळत असला तरी या अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. प्लॅटफॉर्मवर पंखे नसल्यामुळे स्‍थानकातील प्रवासी घामाघूम होतात. याठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्‍थाही नाही.

रिक्षाचालकांच्या लुटमारीला चाप

नवी मुंबई मेट्रोच्या ११ स्थानकांमधून दररोज ६५ अप आणि ६५ डाऊन फेर्‌या होतात. या सेवेमुळे रिक्षातून आणि इको व्हॅनमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. एनएमएमटी बसचे तिकीट दर मेट्रोपेक्षा कमी असल्याने बसप्रवाशांच्या संख्येवर फारसा परिणाम झालेला नाही. मात्र बेलापूर ते तळोजा या पल्ल्यासाठी विनामीटरने बेकायदा भाडे आकारणाऱ्या तीन आसनी रिक्षाचालकांच्या लुटमारीला चाप बसला आहे.

नवी मुंबई मेट्रोचे तिकीट दर जास्त असून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडतील, असे हवेत. मेट्रोचा प्रवास गारेगार व सुखकर असला, तरी मासिक पासची सुविधा नाही, रिटर्न तिकिटाची सुद्धा मिळत नाही, फ्लॅटफार्मवर पंखे नाहीत, पाणी पिण्याची सुविधा नाही. त्यामुळे सिडकोने या सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

- अक्षय कांबळे, प्रवासी

नवी मुंबई मेट्रो सेवा सुरू होऊन सहा महिने उलटले आहे. अद्याप मेट्रोमध्ये मासिक पासची सुविधा सुरू करण्यात आलेली नाही. किती दिवस प्रवाशांनी स्टोअर व्हॅल्यू पास वापरायचा?

- योगेश लाटे, प्रवासी

प्रवाशांची संख्या

महिना - प्रवासी

नोव्हेंबर २०२३ - २.२३ लाख

डिसेंबर २०२३ - ३.७७ लाख

जानेवारी २०२४ - ३.६० लाख

फेब्रुवारी २०२४ - ३.८५ लाख

मार्च २०२४ - ३.७ लाख

एप्रिल २०२४ - ३.९ लाख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com