मुंबई - मुंबईतील म्हाडाच्या संक्रमण शिबिरे आणि घरांमध्ये घुसखोरी केल्याच्या अनेक घटना यापूर्वी आपण वाचल्या आहेत. यावेळी मात्र चक्क म्हाडाने इमारतीत घुसखोरी केल्याचा आरोप लालबागमधील एका सहकारी गृहनिर्माण संस्थेत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांनी केला आहे. याविरोधात हे नागरिक आजपासून लालबागमध्ये साखळी उपोषणदेखील करणार आहेत.
लालबाग येथील गोदरेज कंपाऊंडमधील यशोमंगल सहकारी गृहनिर्माण संस्थेतील रिक्त गाळे म्हाडा प्राधिकरणाने संक्रमण शिबीर म्हणून जाहीर करून बीडीडीच्या रहिवाशांना राहण्यास दिले आहे. २४ मे २०२३ पासून याठिकाणी वरळी बीडीडी पुनर्वसन प्रकल्पातील शिबिरार्थी राहण्यास आले आहे. ३० शिबिरार्थी इमारतीत सामान ठेवून गेल्याचे सोसायटीने सांगितले.
मात्र, नोंदणीकृत इमारतीचे अशा पद्धतीने संक्रमण शिबीर करण्यास सोसायटीमधील मूळ रहिवाशांचा विरोध आहे. यासंबंधी रहिवाशांना विश्वासात घेतले नसल्याचा त्यांचा आरोप आहे. याविरोधात यशोमंगल सहकारी सोसायटीचे रहिवासी आज ता. ५ जूनपासून साखळी उपोषण करणार आहेत. तसेच, म्हाडाने हा ठराव रद्द करावा यामागणीसाठी यशोमंगल सहकारी गृहनिर्माण संस्था न्यायालयात दाद मागणार असल्याचेही संस्थेचे सचिव दशरथ नर यांनी सांगितले.
दरम्यान, चाळीचा पुनर्विकास म्हाडाने ३३ (७) अंतर्गत केला आहे, त्यामुळे नियमानुसार या अंतर्गत संक्रमण शिबिर करता येत नाही. तरी म्हाडाने संक्रमण शिबिरास मान्यता दिली. त्याऐवजी म्हाडाने जाहिरात काढून अत्यल्प उत्पन्न गटासाठी या घरांची विक्री करावी किंवा मास्टर लिस्टमधील रहिवाशांना कायम स्वरुपी जागा द्यावी. म्हाडा मुंबई मंडळ अधिकारी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, स्थानिक आमदारांसह विविध सदस्यांना पत्रे पाठवून हे संक्रमण शिबीर रद्द करण्याची विनंती केली आहे. यापूर्वी बीडीडी ना.म. जोशी मार्ग येथील शिबिरार्थींना वरळी, नायगाव येथील संक्रमण शिबीर देण्यात आले होते. ते रद्द करून या सोसायटीत देण्यात आले आहे, अशी माहिती रहिवाशी योगेश पाटील यांनी दिली आहे.
६४ गाळे संक्रमण शिबीर करण्याचा म्हाडाचा ठराव
१२ एप्रिल २०२३ रोजी म्हाडाने यशोमंगल सोसायटीला पत्र दिले. बीडीडी ना.म.जोशी मार्ग हा शासनाचा अतिमहत्त्वाकांक्षी पुनर्विकास प्रकल्प असून तो लवकरात लवकर मार्गी लावण्याचा शासनाचा मानस आहे. बदानी बोहरी चाळीचे ६४ गाळे बीडीडी येथील रहिवाशांना संक्रमण शिबीर म्हणून वितरित करण्यात येत असल्याचा ठराव म्हाडाने मंजूर केला आहे, असे म्हाडाने सोसायटीला पाठविलेल्या पत्रात म्हंटले आहे.
जुनी बदानी बोहरी चाळीचा पुनर्विकास करून इमारत
म्हाडाच्या इमारत दुरुस्ती आणि पुनर्विकास मंडळामार्फत जुनी बदानी बोहरी चाळीचा पुनर्विकास करून इथे २० मजली इमारत बांधली. यावेळी मूळ ८८ भाडेकरूंना मार्च २०१८ इथे राहण्यास परवानगी देण्यात आली. या इमारतीतील ७ ते १८ या मजल्यांची अंशत: ओसी घेण्यात आली. उर्वरित ६८ सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ४ सदनिकांची विक्री झाली. मात्र १ ते ६ व १९,२० या मजल्यांसाठी ठेकेदार कंपनीने कोणतेही प्रयत्न न केल्यामुळे ओसी मिळाली नाही, अशी माहिती सोसायटीने दिली.
२४ तारखेला सकाळी ११ वाजता पोलीस अधिकारी, म्हाडा अधिकारी सोसायटीमध्ये आले. आम्ही त्यांना प्रश्न केला आहे की, त्यांनी जे रहिवाशी इथे आणले ते कोण आहेत? सोसायटीला विश्वासात न घेता म्हाडाने संक्रमण शिबीर केले. मात्र आता जे रहिवाशी ते इथे पाठवत आहेत त्यांची माहिती आणि कागदपत्रे सोसायटीला देणे म्हाडाला बंधनकारक आहे. हे रहिवाशी नक्की संक्रमण शिबिरातील आहेत की आणखी कोण? याची शहानिशा कोण करणार? त्यांची माहिती म्हाडाने आम्हाला का दिली नाही? आजपर्यंत आम्हाला त्यांचे कोणतेही कागदपत्र म्हाडाने दिले नाहीत.
- विश्वनाथ मांजरेकर, अध्यक्ष, यशवंत गृहनिर्माण संस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.