मुंबई : एसटी महामंडळातील मुंबई सेंट्रल बस स्थानकावर जिल्हा नियोजन मंडळाच्या ३ टक्के निधीतून वातानुकूलित हिरकणी कक्षाचे उद्घाटनाचे निमित्त होते. त्यासाठी एसटीच्या महामंडळाच्या मुख्यालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी सकाळपासूनच कामाला लागले होते.
शालेय शिक्षण मंत्री असले तरी केसरकर मुंबईचे पालकमंत्री सुद्धा आहेत. त्यामुळे सायंकाळी ६ वाजता त्यांच्या हस्ते उद्घाटनाचा मुहूर्त ठरला. महिला अधिकारी कर्मचारी नेहमीप्रमाणे नटून थटून स्वागतासाठी सज्ज होत्या. तर ठिकठिकाणी रांगोळी, फुल हार लावून सजावट करण्यात आली होती.
माध्यम प्रतिनिधींना सुद्धा ६ वाजता उद्घाटन असल्याचे निमंत्रण पाठवून बोलवण्यात आले होते. दिवसभरातील संपूर्ण तयारीनंतर सायंकाळी ६ वाजले, मात्र मंत्री केसरकर उद्घाटनाला रात्री ९ वाजता पोहचल्याने संपूर्ण अधिकाऱ्यांना तात्कळत राहावे लागले.
जिल्हा नियोजन मंडळाच्या ३ टक्के निधीतून बांधण्यात आलेल्या पहिल्या हिरकणी कक्षाचे मुंबई सेंट्रल बसस्थानकावर मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. दरम्यान त्याचवेळी त्यांनी मुंबई सेंट्रल येथील सध्याच्या चालक - वाहक विश्रांतीगृहाला भेट दिली व एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
या वेळी एस. टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव नीवतकर व एसटीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी दिवसभर दमून-भागून आलेल्या कष्टकरी चालक वाहकांना चांगली झोप लागावी, यासाठी वातानुकूलित विश्रांती गृह बांधून देण्याचे आश्वासन केसरकर यांनी दिले.
ते पुढे म्हणाले की, मी कोकणातील आहे. एसटी आणि कोकणी माणसाचे ऋणानुबंध खूप जुने आहेत. गणपती व होळी सारख्या सणाबरोबरच मुंबईच्या चाकरमान्यांना उन्हाळी सुट्टीसाठी ,आंगणेवाडीच्या यात्रेसाठी सुखरूप घेऊन जाण्याचं काम,गेली कित्येक वर्ष एसटी इमानेइतबारे करत आली आहे. यावेळी त्यांनी सावंतवाडी- मुंबई या पहिल्या रातराणी बसची आठवण आवर्जून सांगितली.
अमृत महोत्सवी ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या एसटी बसेस मधून मोफत प्रवास व महिलांना ५० टक्के प्रवासी भाड्यात सवलत या शासनाने घेतलेल्या दोन क्रांतिकारी निर्णयामुळे एसटीला पुन्हा अच्छे दिन आले आहेत, हे पाहून शासनाचा एक घटक म्हणून मला अभिमान वाटतो असे देखील त्यांनी यावेळी नमूद केले.
मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने जिल्हा नियोजन विकास निधीतून मुंबई सेंट्रल बसस्थानक येथील महिला व पुरुष विश्रांती गृह वातानुकूलित सुविधेसह अत्याधुनिक करून देण्याचे निर्देश कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मुंबई शहर जिल्हाधिकारी यांना दिले. भविष्यात प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी सर्व सोयी -सुविधानी सुसज्ज अशी विश्रांती गृहे जिल्हा नियोजन व विकास योजनेतून व्हावीत यासाठी हा प्रकल्प पथदर्शी ठरेल, असा आशावाद याप्रसंगी मंत्री केसरकर यांनी व्यक्त केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.