ठाणे- प्रभू रामचंद्रांचा वनवास १४ वर्षांनी संपला; पण मुंबई- गोवा महामार्ग १४ वर्षांत झाला नाही, याचे दुःख वाटत आहे. नुसते पाहणी दौरे कशासाठी करायचे, त्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी चमकोगिरी करणाऱ्या कुचकामी रवींद्र चव्हाण यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायला हवा, असा महायुतीला 'घरचा आहेर' शिवसेना शिंदे गटाचे रामदास कदम यांनी दिला. विशेष म्हणजे ठाण्यात मेळाव्याच्या निमित्ताने येत त्यांनी चव्हाण यांना डिवचले असल्याने आता भाजप गोटात नाराजी व्यक्त होत आहे.
ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतन येथे शिवसेना शिंदे गटाचा मेळावा झाला. या वेळी रामदास कदम यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत अनेक मुद्द्यांना हात घातला. या वेळी उद्धव ठाकरेंपासून ते भाजप नेत्यांपर्यंत अनेकांचा त्यांनी समाचार घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सध्याच्या मुंबई-गोवा महामार्गावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना खडे बोल सुनावले.