TB : मिरा-भाईंदर शहरात गेल्या वर्षी २४ कुष्ठरुग्ण व २,४६४ क्षयरुग्णांना बरे करण्यात महापालिकेच्या आरोग्य विभागाला यश आले आहे. यावर्षी या विभागाकडून पुन्हा एकदा नव्याने कुष्ठरोग, तसेच क्षयरोग रुग्णांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
२० नोव्हेंबर ते ६ डिसेंबरदरम्यान ही मोहीम राबविण्यात येत असून त्यात महापालिका कार्यक्षेत्रातील जोखीमग्रस्त भागातील घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणात घरामधील सर्व सभासदांची कुष्ठरोगाबाबत व क्षयरोगाची लक्षणे असलेल्या संशयित रुग्णांची शारीरिक तपासणी करण्यात येणार आहे.
मिरा-भाईंदरमधील एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के म्हणजेच जोखीमग्रस्त ३,३९,५९२ लोकसंख्येमधील सर्व संशयितांची तपासणी केली जाणार आहे. त्यात कुष्ठरोगासाठी अंदाजित ३,३६० संशयित रुग्ण नोंदणी होणार आहे व त्यामधून २३ रुग्णांचे निदान होणे व क्षयरोगासाठी अंदाजित ६,७९१ संशयित क्षयरुग्ण शोधून त्यातून ३३९ रुग्णांचे निदान होणे महापालिकेच्या आरोग्य विभागाला अपेक्षित आहे.
यावर्षी देखील रुग्णांचा शोध घेण्यासाठी १६९ प्रशिक्षित आरोग्य पथकांची स्थापना करण्यात आली. या पथकांकडून क्षयरोग, कुष्ठरोगाची लक्षणे असलेल्यांची तपासणी केली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत घरातील एकही सदस्य तपासणीपासून वंचित राहू नये, यासाठी कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष सर्वेक्षणासाठी येणाऱ्या आरोग्य पथकाला सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य विभागाचे उपायुक्त संजय शिंदे, अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे व आयुक्त संजय काटकर यांनी केले आहे.
कुष्ठरोगाची लक्षणे
त्वचेवर फिकट लालसर बधीर चट्टा, त्याठिकाणी घाम न येणे, जाड बधिर तेलकट चकाकणारी त्वचा, त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे, बधिरपणा अथवा जखमा असणे
क्षयरोगाची लक्षणे
दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा खोकला, संध्याकाळी येणारा हलकासा ताप, वजनात लक्षणीय घट, थुंकीवाटे रक्त येणे, मानेवरील गाठ
सद्य:स्थितीत मिरा-भाईंदर महापालिका कार्यक्षेत्रात सांसर्गिक व असांसर्गिक असे एकूण ३२ रुग्ण औषधोपचार घेत असून गेल्यावर्षी २४ कुष्ठरुग्ण रोगमुक्त झाले आहेत. तसेच सध्या क्षयरुग्णांचे १९०० रुग्ण औषधोपचार घेत असून गतवर्षी २,०३४ रुग्ण औषधोपचार घेत होते, त्यातील एकंदर २,४६४ क्षयरुग्णांना बरे करण्यात आले आहे.
- डॉ. बालनाथ चकोर, शहर क्षयरोग अधिकारी, आरोग्य विभाग, मिरा-भाईंदर महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.