MNS Reply to UBT : बीडमध्ये राज ठाकरे यांचा ताफा ठाकरेंच्या शिवसैनिकांनी अडवला आणि मोठा राडा घातला. राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर सुपाऱ्यांचा सडा टाकून आरक्षणाला विरोध केल्याप्रकरणी शिवसैनिकांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली. यानंतर तिथं असलेले मनसे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये चांगलीच जुंपली. यावर आता मनसेच्यावतीनं पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
राज ठाकरे २० जुलैपासून राज्याचा दौरा करत आहेत. २२५ विधानभा मतदारसंघांचा आढावा ते या दौऱ्यातून घेणार आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं होतं. महाराष्ट्रात कोणालाही आरक्षणाची गरज नाही असं ते म्हणाले होते. यानंतर मराठा आंदोलक संतप्त झाले असून त्यांच्याकडून राज ठाकरेंना जाब विचारला जात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. आज ते बीडमध्ये होते, जालना रोड परिसरात राज ठाकरे यांची बैठक होणार होती. दरम्यान राज ठाकरे दाखल होताच त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर हा राडा झाल्याचं पाहायला मिळालं.
इथं पोहोचताच राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घेरलं. अखेप पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांना बाजूला करत राज ठाकरेंचा ताफा पुढे गेला. राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यामुळेच हा राडा झाला असल्याचे सांगितले जात आहे. या दोन्ही गटात तणाव निर्माण झाला असून पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
या राड्यानंतर संदीप देशपांडे यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे मनसेची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटलं की, "उबाठा सगळ्या महाराष्ट्र सैनिकांकडून सांगतोय सुरुवात तुम्ही केली आहे, याचा शेवट आम्ही करणार" देशपांडे यांच्या या इशाऱ्यानंतर येत्या काही दिवसांत जसजशा विधानसभा निवडणुका जवळ येतील तसतसा राजकीय संघर्ष वाढताना दिसणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.