मुंबई : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या सूचनेनुसार बार मालकांकडून चार कोटी 70 लाख रुपये जमा केल्याचा स्फोटक दावा बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांने सक्त वसुली संचलनालयाला (ईडी) दिलेल्या जबाबात केला आहे. ही रक्कम देखमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदेने वाझेकडून स्वीकारली होती. त्याशिवाय खासगी सचिव संजीव पालांडे पोलिसांच्या बदल्या व बार मालकांची यादी आदी सूचना पुरवत असल्याचा आरोप आहे. शिंदे व पालांडे या दोघांनाही ईडीने याप्रकरणी अटक केली आहे. बार मालकांकडून जमा केलेली ही रक्कम हवाला मार्फत दिल्लीला जाऊन तेथून देशमुख यांच्या नागपूर येथील शिक्षण संस्थेत जमा झाल्याचे ईडीचा दावा आहे.
याबाबत दै. सकाळला मिळालेल्या कागदपत्रांनुसार, सर्व व्यवहार सुरळीत चालवण्यासाठी 60 बार मालकांच्या वतीने महेश शेट्टी व जया पुजारी यांनी तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझेला डिसेंबर 2020 मध्ये गुडलक मनी म्हणून 40 लाख रुपये दिले होते. याशिवाय परिमंडळ 1 ते 7 मधील ऑक्रेस्ट्रा बारमधील जानेवारी, फेब्रुवारी 2021 मध्ये एक कोटी 64 लाख रुपये वाझेला दिले होते. परिमंडळ 8 ते 12 मधील ऑर्क्रेस्ट्रा मालकांनी दोन कोटी 66 लाख रुपये वाझेला याच कालावधीत दिले होते.
बार मालकांना दिलेला पैसा नंबर 1 व क्राईम ब्रांच मधील समाज सेवा शाखेला जात असल्याचे बार मालकांना सांगितले होते. त्यामुळे आता एक नंबर कोण व समाज सेवेतील अधिकारी कोण असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. वाझेने त्या काळात चार कोटी 70 लाख रुपये ऑर्क्रेस्ट्रा मालकांकडून घेतले. तळोजा कारागृहात 19 मे व 21 मेला वाझेचे स्टेटमेंट ईडीने रेकॉर्ड केले. मला देशमुख यांच्याकडून विविध गुन्ह्यांबद्दल थेट सूचना यायच्या. त्यावेळी देशमुख यांनी त्यांच्या निवास्थानी बोलावून प्रत्येक बार मालकाकडून महिन्याला 3 लाख रुपये जमा करण्यास सांगून यादी दिली होती. त्यानुसार आपण यादीतील बार मालकांशी बैठक आयोजीत करून डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 मध्ये चार कोटी 70 लाख रुपये जमा केले. ही रक्कम देशमुख यांच्या सूचनेनुसार त्यांचा खासगी सचिव कुंदन शिंदेला दोन हफ्त्यांमध्ये जानेवारी व फेब्रुवारी 2021 या कालावधीत दिली, असा दावा वाझेने केला आहे. याशिवाय याप्रकरणी दोन पोलिसांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यात वाझे यांनी बारमधील हफ्ता जमा करण्याबाबत वाझेने चर्चा केल्याचे म्हटले आहे. यावेळी देखमुख यांचे पीएस संजीव पालांडे यांनी या दोन पोलिसांना बोलावून शहरातील बार व त्यांच्याकडून घेतल्या जाणा-या पैशांबाबत विचारणा केली असाही दावा केला आहे.
देशमुख यांच्या नागपूर येथील श्री साई शिक्षण संस्था याच्या खात्यावर चार कोटी 18 लाख रुपये जमा झाले. ते दिल्लीतील चार कंपन्यांमार्फत जमा झाले होते. तपासणीत या कंपन्या फक्त कागदोपत्री असून पैसे हस्तांतरणासाठी त्याचा वापर होतोय, असे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले. या कंपनीचे मालक असलेले जैन बंधुंची जबाब नोंदवण्यात आलाय. ही रक्कम हवाला मार्फत त्यांच्याकडे आली होती. ईडीच्या तपासानुसार ऋषिकेश देशमुखने एका व्यक्तीला ही रक्कम पाठवून ट्रस्टमध्ये भरण्यास सांगितल्याचे ईडीचा दावा आहे. बार मालकांकडून घेतलेली 4 कोटी 70 लाखांची ही तीच रक्कम असल्याचा ईडीला संशय असून देशमुख यांच्या मार्फत त्यांच्या मुलाकडे व तेथून हवाला मार्फत दिल्लीतील कंपनी व पुढे देशमुख् यांच्या शिक्षण संस्थेत जमा झाल्याचा ईडीचा दावा आहे. ही रक्कम कुंदन शिंदेने वाझेकडून घेतली होती. त्यामुळे शिंदेला मनी लाँडरीगप्रकरणी अटक करण्यात आली. पालांडे यांनी देशमुख यांच्या वतीने पोलिसांच्या बदल्या व बार मालकांबद्दलची माहिती व सूचना दिल्याचा आरोप आहे.
11 कंपन्यांवर अनिल देशमुख व कुटुंबियांचे थेट नियंत्रण, तर 13 कंपन्या देशमुख कुटुंबियांच्या निकवर्तीयांच्या असल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. कंपन्यांचे एकमेकांसोबत व्यवहार झाल्याचे बँक खात्यांची तपासणीत निष्पन्न झाले आहे. एका कंपन्यांतून दुस-या कंपन्यांमध्ये आपापसात व्यवहार, पण खरे व्यवहार नाहीत, त्या मार्फत बॅलन्स शिटचे आकडे फुगवण्यात आले, एका कंपन्यांतून दुस-या कंपनीकडे पैसे गेलेत, असा ईडाचा दावा आहे. त्या अनुषंगाने 25 मेला सहा ठिकाणी शोध मोहिम, कंपनीशी संबंधीत व्यक्तींचे नागपूर, मुंबई व अहमदाबात येथे ईडीने शोध मोहिम राबवली होती. त्यात संबंधीत व्यक्तीची घरे व कार्यालयांचा समावेश आहे. त्यानुसार याप्रकरणी सहा संचालक व दोन सीएचा जबाब नोंदवण्यात आला होता. देशमुख कुटुंबच्या जवळचे व्यक्ती, त्यांच्या मार्फत कंपनीमध्ये कुटुंबियंचे नियंत्रण असल्याचा ईडाचा दावा आहे. याप्रकरणी विक्रम राज शर्मा हा चार कंपन्यांचा डमी संचालक असून त्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे. मे. क्युबिक्स हॉस्पिटालिटी प्रा. लि. मध्ये अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश पैसे पुरवत आहे. त्याचे या कंपनीवर नियंत्रण आहे. शर्मा हा या कंपन्यांचा संचालक आहे, हे त्याला माहिती नसून ऋषिकेश यांच्या सांगण्यावरून धनादेश व इतर कागदपत्रांवर स्वाक्षरी करत असल्याचे सांगितले. तसेच सीए प्रकाश रमाणी यानेही क्युबिक्स ही कंपनीवर देशमुख कुटुंबियांचे नियंत्रण असल्याचे जबाबात सांगितले. याशिवाय सागर बटवारा याने ईडीला स्टेटमेंटमध्ये मे सिब्लिंग वेअरहाऊस प्रा.लि. ही कंपनी हँडलिंक व वाहतुकीचा व्यवसाय करते. पण तिने कोणतीही ट्रान्स्पोर्टेशन गाडी खरेदी केली नाही. त्या ऐवजी 4 पॅसेंजर गाड्या खरेदी केल्या. त्यातील एक मर्सिडीज कार ऋषिकेश देशमुख वापरतो, असा जबाब दिला आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्याबाबत समन्सही बजावला होता. त्याबाबत देशमुख यांनी ईडीच्या कार्यालयात चैाकशीला उपस्थित राहणार नसल्याचे पत्र वकीलांनी ईडीला सादर केलं आहे.
देशमुखांना ईडीनं समन्स बजावून आज कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावर देशमुख यांच्या वकिलांनी ईडी कार्यालयात जाऊन पत्र सादर केले. ईडीने समन्स बजावला आहे. त्या संदर्भातील कोणतीही कागदपत्रे ईडीकडून आम्हाला देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्या गुन्ह्यांचा संदर्भात चौकशी ते करणार आहेत. याची कल्पना नाही. मात्र केंद्रीय तपास यंञेणेकडून जानवी पूर्वक दबाव टाकला जात असल्याची माहिती देशमुखांच्या वकिलांनी दिली. अनिल देशमुख यांच्याकडून त्यांच्या वकिलांनी दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, त्यांचा जबाब काल ईडीने पीएलएमएच्या कलम 50 नुसार नोंदवलेला आहे. त्यांचे वय 72 वर्ष आहे. त्यांना आरोग्य संदर्भात अनेक व्याधी आहेत. ते काल अनेक लोकांशी संपर्क झालेला आहे आणि माहितीही दिलेली आहे. माझेवर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत. त्यात काही तथ्य नाही असे पत्रात म्हटले आहे.तसेच या पत्रात त्यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यांची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.