आंदोलकानाच्या मंडपात पाणी शिरल्याने अनेक संघटनांना आपले आंदोलन मागणी पूर्ण होण्यापूर्वीच गुंडाळावे लागले.
Mumbai Rain: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) पार्श्वभूमीवर मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan Mumbai) विविध विषयांना वाचा फोडणारे आंदोलन सुरु असते. राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने आंदोलक या ठिकाणी जमा झाले आहेत.
मात्र, दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे या आंदोलकांची गैरसोय झाली आहे. तर पावसाळ्यापूर्वी प्रशासनाने मैदानावर मंडप उभारणे व इतर काम न केल्याने आंदोलकांना भर पावसात आंदोलन करण्याची वेळ आली.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तीन आठवड्यांपर्यंत चालणार आहे. १७ जुलै ते ४ ऑगस्ट या १९ दिवसांच्या कालावधीत मुंबईत हे अधिवेशन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बारसू रिफायनरीच्या विरोधात आझाद मैदानात आंदोलन करण्यात आले.
त्याचबरोबर आशा सेविका, गिरणी कामगार, विद्यार्थी संघटना, पीएचडीधारक, नेट सेट धारक शिक्षक संघटना, शेतकरी संघटना, महावितरण कर्मचारी, एसटी कर्मचारी संघटना अशा विविध संघटना आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. याठिकाणी मोठ्यासंख्येने पोलीस बंदोबस्तही तैनात आहे. मात्र, बुधवार आणि गुरुवारी मुंबईत मुसळधार पावसामुळे मैदानावर सर्वत्र पाणी साठले.
तर आंदोलकानाच्या मंडपात पाणी शिरल्याने अनेक संघटनांना आपले आंदोलन मागणी पूर्ण होण्यापूर्वीच गुंडाळावे लागले. मुंबईत पावसाचा इशारा असूनही प्रशासनकडून आंदोलकांसाठी व्यवस्था न उभारल्यामुळे आंदोलकांनी राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
आंदोलकांची वाढती संख्या लक्षात घेता बुधवारी (ता.२०) रोजी प्रशासनाकडून मैदानावरील मंडपाच्या संख्येत वाढ करण्यास सुरुवात करण्यात आली. मोठ्या मंडपाला लागूनच २ नवीन मोठे मंडप मैदानावर तातडीने उभारले जात आहेत. तसेच, मंडपात पाणी येणार नाही यासाठीही व्यवस्था उभारली जाते आहे. ज्याठिकाणी मंडपात चिखल आणि पाणी आले होते. तिथेही कर्मचारी साफसफाई करताना दिसून आले. वाढत्या पावसामुळे बुधवारी आंदोलनाच्या संख्येत घट झाली असल्याचे निदर्शनात आले.
आम्ही शेतकरी माणसं पावसापाण्यात आम्हाला काम करण्याची सवय आहे. मात्र, आंदोलकांना त्रास कसा द्यायचा तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्था काय आहे. पावसाचा इशारा असूनही आता पाऊस सुरु झाल्यावर इथे मंडप उभारत आहेत. आमच्या महिला भगिनी चिखलात बसल्या आहेत. आंदोलन दडपण्यासाठी हे सर्व सुरु आहे.
-किशोर गायकवाड, आंदोलक शेतकरी
आमच्यातील अनेक महिला अमरावती, नांदेड, लातूर, नाशिक अशा राज्याच्या विविध भागातून आल्या आहेत. पावसामुळे आता आमच्यातील प्रमुख काही व्यक्तीना निवेदन देण्यासाठी विधानभवनात जाण्याची परवानगी दिली आहे. मात्र, आमच्या महिला आता परत जायला निघाल्या आहेत. कारण सगळ्या मैदानावर इथे आतमध्ये ताडपत्र्यावर चिखल आणि पाणी आलं आहे. पावसाचा अंदाज होता तर इथे किमान मंडपात पाणी येणार नाही. सगळ्या आंदोलकांना बसता येईल आधी व्यवस्था करायला हवी होती.
-आशा पाटील, आशा सेविका
आम्ही नांदेडहून आलो आहोत. राज्यातील रिक्त जागांवर शिक्षक भरती व्हावी यामागणीसाठी आम्ही आंदोलन करत आहोत. २ दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस आहे. आम्ही उभारलेले मंडप उडून गेले. प्रशासनाला आझाद मैदानात आंदोलन सुरु आहेत याची माहिती होती. पावसाचा इशाराही होता तरी आंदोलकांकडे दुर्लक्ष्य करण्यात आले.
-तुषार देशमुख, आंदोलक
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.