मुंबई : मुंबईत तैनात असलेल्या 22 व्या क्षेपणास्त्रवाहू नौकांच्या ताफ्याला (किलर स्क्वार्डन) राष्ट्रपतींच्याहस्ते प्रेसिडंट स्टँडर्ड हा विशेष पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. येत्या बुधवारी (8 डिसेंबर) येथील नौदल गोदीत हा पुरस्कार दिला जाईल.
या सोहळ्यानिमित्त पोस्टखात्यातर्फे विशेष टपाल तिकीट आणि पाकीट देखील प्रसिद्ध केले जाणार आहे. या सोहळ्यास महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच नौदलप्रमुख तसेच सेनादलातील आणि नागरी सेवेतील अन्य मान्यवर अधिकारी हजर राहण्याची शक्यता आहे.
सैन्यदलांच्या पथकाने बजावलेल्या देशसेवेसाठी राष्ट्रपतींद्वारे दिला जाणारा प्रेसिडंट स्टँडर्ड हा सर्वोच्च पुरस्कार आहे. तेव्हाचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याहस्ते नौदलाला 27 मे 1951 रोजी प्रेसिडंट कलर्स हा पुरस्कार देण्यात आला होता. प्रेसिडंट स्टँडर्ड हा तशाच प्रकारचा मानाचा पुरस्कार आहे, मात्र तो सैन्यदलातील छोट्या विभागाला दिला जातो.
22 वे क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकांचे पथक मुंबईत ऑक्टोबर 1991 मध्ये स्थापन केले. यात वीर वर्गाच्या दहा आणि प्रबळ वर्गाच्या तीन क्षेपणास्त्रवाहू नौका आहेत. तर त्यापूर्वीच्या किलर स्वार्डन पथकातील युद्धनौका रशियातून आणल्या होत्या. त्यांनी बांग्लादेशमुक्ती युद्धात अजोड कामगिरी केली होती. हे वर्ष बांग्लादेश मुक्तीसंग्रामाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून ते देशभर स्वर्णिम विजयवर्ष म्हणून साजरे केले जात आहे.
किलर स्वार्डन पथकाच्या स्थापनेचेदेखील हे पन्नासावे वर्ष आहे. या पथकाने ऑपरेशन विजय, ऑपरेशन पराक्रम या मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता तसेच पुलवामा अतिरेकी हल्ल्यानंतरही या युद्धनौका पाकिस्तानी किनारपट्टीपासून जवळ हल्ल्याच्या टप्प्यात सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. या ताफ्याला महावीरचक्र, सात वीरचक्र तसेच आठ नौसेना शौर्य पदके देण्यात आली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.