मुंबईतील वाहनांची वाढती संख्या पाहता, बेस्ट उपक्रम इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंगचा पर्याय मुंबईकरांना देणार आहे.
मुंबई - मुंबईतील वाहनांची वाढती संख्या पाहता, बेस्ट उपक्रम इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंगचा पर्याय मुंबईकरांना देणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात बेस्ट उपक्रमाकडून ५५ इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन कार्यान्वयित होणार आहेत. मुंबई शहरातील बेस्टचे आगार आणि परिसरात ही सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासोबतच मोबाईल एपचाही पर्याय ग्राहकांना येत्या काळात विकसित करण्याचा बेस्टचा मानस आहे.
सध्या बेस्टच्या २४ आगारांमध्ये बेस्टने प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्यासाठीचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत २ ते ३ ठिकाणी चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाले आहे. बेस्ट आगारातील जागेचा वापर हा बेस्टच्या बसेससाठी होईल. तर आगाराच्या बाहेरील जागेत खासगी वाहनांना चार्जिंगचा पर्याय असणार आहे. येत्या काही महिन्यांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरात १० ते १२ ठिकाणी हे इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उपलब्ध असतील.
सध्या एनएससी वरळी, कुलाबा, बॅकबे अशा ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन विकसित झाले आहेत. तसेच खासगी सोसायटीच्या परिसरातही बेस्ट उपक्रमाकडून मीटर पुरवण्यात येत आहेत. बेस्टच्या डेपोच्या ठिकाणी ४० किलो वॉट ते ५० किलो वॉटचे चार्जर देण्यात येत आहेत. तर खासगी वाहनांसाठी १० ते ११ किलोवॉटचे चार्जर देण्यात येत आहेत. मुंबईतील डेपोसाठी साधारणपणे १०० मेगावॉट विजेची तरतूद करण्यात आली आहे. याठिकाणी स्वच्छ ऊर्जेचा वापर करण्यासाठी प्राधान्य असेल, अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.
मुंबई शहरात बेस्ट विद्युत पुरवठा उपक्रमाच्या माध्यमातून इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनचे नेटवर्क उभारण्यात येईल. तर उपनगरामध्ये मात्र अदाणी किंवा महावितरण तसेच टाटा पॉवरच्या वीज वितरण जाळ्यातून ही स्टेशनची उभारणी करण्यात येईल. बेस्टने स्वच्छ ऊर्जा खरेदीसाठी सौर ऊर्जेसाठीचे सामंजस्य करार केले आहेत. त्यानुसारच ही वीज चार्जिंग स्टेशनसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
बेस्टच्या ग्राहकांसाठी एपची सुविधा
मुंबईत इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनचा वापर करणाऱ्या बेस्टच्या ग्राहकांसाठी मोबाईल एपचीही सुविधा देण्यात येणार आहे. एपच्या माध्यमातून मुंबईकरांना नजीकचे इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन शोधणे शक्य होईल. तसेच एखाद्या चार्जिंग स्टेशनवर किती गाड्यांचे चार्जिंग सुरू आहे, ही माहिती मिळाल्यामुळे ओपन स्लॉटदेखील शोधणे शक्य होणार आहे. बेस्ट उपक्रमाकडून या एप्लिकेशनची चाचपणी सध्या होत आहे. त्यामुळे लवकरच मुंबईकरांना बेस्टच्या या नव्या एपचा वापर करणे शक्य होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.