मुंबई भाजपा अध्यक्ष शेलार म्हणतात मी नालेसफाईची पहाणी करतोय

मुंबई भाजपा अध्यक्ष शेलार म्हणतात मी नालेसफाईची पहाणी करतोय

Published on

भाजप शहराध्यक्ष आशीष शेलार यांच्याकडून नालेसफाईची पाहणी
मुंबई : उपनगरातील नाल्याचा गाळ वसईतील ज्या खासगी डंम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येतो आहे त्याचे ऑडिट करण्यात आले आहे का, असा सवाल करीत मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी पश्चिम उपनगरातील नालेसफाईच्या कामावरून प्रश्‍न उपस्थित केला. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी पश्चिम उपनगरातील नालेसफाईच्या कामांचा पाहणी दौरा केला. आज त्यांनी अंधेरी, वर्सोवा येथील नाल्यांची पाहणी केली. पश्चिम उपनगरातील इर्ला नाल्याची पाहणी केली असता अद्याप काम पूर्ण न झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर जीवननगर नाल्यात अद्याप गाळाचे थर, फ्लोटींग मटेरियल कायम असून पालिका अधिकारी सांगत असलेले आकडे आणि प्रत्यक्षातील चित्र यात तफावत दिसून आल्याचे आमदार आशीष शेलार यांनी म्हटले आहे.
…….
धारावीतील रस्त्यांवर बेकायदा वाहन तळ
धारावी (बातमीदार) : धारावीतील अंतर्गत आणि मोठ्या रस्त्यावर अनधिकृतपणे दुचाकी व चारचाकी वाहने उभी करून ठेवली जात आहेत. यामुळे रस्त्यांवर अनेकदा वाहतूक कोंडी होत आहे. या बेकायदा वाहनतळावर वाहतूक पोलिस विभाग कारवाई का करत नाही, असा प्रश्न स्थानिक रहिवासी विचारात आहेत. धारावीतील सर्वात मोठा रस्ता म्हणून ओळखला जाणारा ९० फुटी रस्ता सतत गजबजलेला असतो. येथे पादचारी आणि वाहनांची मोठी वर्दळ चालू असते. हा रस्ता म्हणजे वाहनचालाकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. या रस्त्यावर जागोजागी वाहने उभी करून ठेवली जातात. यामुळे रस्त्यावरून चालणे व वाहन नेणे जिकिरीचे होते. यामुळे रस्ता सतत वाहतूक कोंडीमध्ये अडकलेला असतो. आपत्कालीनसमयी या रस्त्यावरून रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या नेताना अनेकदा वाहतूक कोंडीत अडकून पडण्याच्या घटना घडत आहेत. अशीच अवस्था धारावीतील दुसरा मोठा रस्ता म्हणजे ६० फुटी रस्ता आहे. या रस्त्यावरही वाहने उभी करून ठेवल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते.
……..
‘अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा जूनमध्ये घ्या’
घाटकोपर (बातमीदार) : इयत्ता पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेऊन १५ जूनपूर्वी म्हणजेच शाळा सुरू होण्यापूर्वी निकाल लावण्याचे निर्देश शासनस्तरावरून देण्यात आले आहेत. मात्र, यावर्षी २० मे रोजी मुंबई जिल्ह्यात लोकसभा निवडणुका होत्या. थोड्याफार फरकाने संपूर्ण राज्यात उन्हाळी सुटीत लोकसभा निवडणुका होत्या. लोकसभा निवडणूक प्रशिक्षण आणि निवडणूक कामामुळे सर्व शिक्षकांना उन्हाळी सुटीतही आपल्या मूळगावी जाणे शक्य झाले नाही. काही कौटुंबिक कार्यक्रम, नातेवाइकांच्या भेटी यास्तव लोकसभा निवडणूक झाल्यानंतर शिक्षक आपल्या मूळ गावी गेले असल्याची माहिती संघटनेचे विभाग संघटक प्रवीण पुरी यांनी यावेळी दिली. त्यामुळे पाचवी आणि आठवी पुनर्परीक्षा १० जून रोजी घेतली तरी निकाल वेळेत लावून पुढील शैक्षणिक वर्षात संबंधित विद्यार्थ्याला प्रवेश देता येणे शक्य आहे. तरी शासनाने वरील सर्व बाबींचा विचार करून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात न घेता, जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्याबाबत सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com