मुंबई - मुंबई खड्डे मुक्त करण्याचा एक भाग म्हणून मुंबईतील सर्व रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण केले जात आहे. शहर भागातील ७२ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी मुंबई महापालिकेने तिस-यांदा निविदा मागवल्या आहेत. कॉंक्रीटच्या रस्त्यांसाठी १,३६२ कोटी ३४ लाख ६ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. काही दिवसात रस्ते कामांचा धुमधडाका सुरू होणार आहे.
मुंबईतील रस्त्यांची पावसाळ्यात दुरावस्था होते. पालिकेच्या कोट्यावधी रुपयांचे नुकसान होते. त्यामुळे मजबूत आणि टीकाऊ सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करण्याठी पालिकेने निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई शहर व दोन्ही उपनगरातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये ४०० किलोमीटर रस्ते कामाचे कंत्राट देण्यात आले.
पूर्व उपनगरातील ७० किमी व पश्चिम उपनगरातील २५३.६५ किमीच्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची कामे प्रशासनाने हाती घेतली. मात्र मुंबई शहरातील ७२ किलोमीटरच्या सिमेंट काँक्रिटच्या रस्ते कामांकडे कंत्राटदारांने पाठ फिरवल्याने गेल्या वर्षभरात शहरातील एकही रस्ता सिमेंट काँक्रिकटचा झालेला नाही. मे. रोडवे सोल्युशन इन्फ्रा प्रा. लि. या कंत्राटदाराला रस्त्यांचे काम देण्यात आले होते.
नियोजित वेळेत काम सुरू न केल्याने पालिकेने या कंत्राटदाराला सुमारे ५२ कोटींचा दंड ठोठावत कंत्राट रद्द केले होते. शहर भागातील कामे सुरू न झाल्याने राजकीय नेत्यांचे पालिका प्रशासनावर आरोपही करण्यात आले. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत पालिका आयुक्त डॉ इकबाल सिंग चहल यांना पत्र पाठवून रस्ते कंत्राटात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.
या पार्श्वभूमीवर पालिकेने या कामासाठी पुन्हा निविदा मागवल्या मात्र दोनवेळा निविदा रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे शहरातील रस्ते कामांना विलंब झाला आहे. आता तिस-यांदा निविदा प्रक्रिया राबवली जात असल्याने शहरातील नागरिकांना खड्डेमुक्त रस्त्यांसाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे.
मुंबईत मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर अल्पावधीतच रस्ते खड्डेमय़ होत असल्याने पालिका टीकेचे लक्ष्य बनते. सुरुवातीच्या पावसांतच रस्त्यांची चाळण होत असल्याने पावसात मुंबईकरांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
काँक्रिटीकरणासाठी होणारा खर्च -
- शहर १,३६२ कोटी ३४ लाख ६ हजार
- पूर्व उपनगर ८४६ कोटी १७ लाख ६१ हजार
- पश्चिम उपनगर
परिमंडळ : ३ - १२२३ कोटी ८४ लाख ८३ हजार
परिमंडळ : ४ - १६३१ कोटी १९ लाख १८ हजार
परिमंडळ : ७ - ११४५ कोटी १८ लाख ९२ हजार
रस्त्यांची किलोमीटर कामे -
शहर विभाग ७२ किमी
पूर्व उपनगर ७० किमी
पश्चिम उपनगर २५३.६५ किमी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.