मुंबई: मुंबईत गेल्या पाच ते सहा दिवसांपासून 3 ते 5 हजारांच्या घरात नवीन कोरोना रुग्ण सापडत आहेत. मुंबईतील कडक निर्बंध आणि लॉकडाऊनमुळे ही रुग्णसंख्या कमी झालेली पाहायला मिळत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे मुंबईतील कोविड रुग्ण दुपटीच्या कालावधीत वाढ झाली असून एका महिन्यात 49 वरुन थेट 96 दिवसांवर हा कालावधी झाला आहे.
एका महिन्यापूर्वी म्हणजेच 1 एप्रिल या दिवशी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 49 दिवसांवर होता. 15 एप्रिलला तो कमी होऊन 42 दिवसांवर गेला. पण आता रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 1 मे या दिवशी 96 दिवसांवर पोहोचला असून ही एक सकारात्मक बाब असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञ मांडतात. दरम्यान अनलॉक करण्याआधी लसीकरणाचा वेग वाढवणे आणि लोकांनी कोविड बाबतीतील स्वयंशिस्त पाळणे या दोन्ही गोष्टी महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.
गेल्या 24 तासात 1 मे या दिवशी मुंबईत 3 हजार 908 नवीन रुग्ण सापडले होते. दिवसेंदिवस पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईचा रुग्ण दुपटीचा दर हा वाढला असून टीपीआर म्हणजेच टेस्ट पॉझिटिव्हीटी रेट ही कमी झाला असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले.
तीन गोष्टींचा सकारात्मक परिणाम
मुंबईत सध्या तीन गोष्टींचा सकारात्मक परिणाम झाला आहे. चाचण्यांचा वेग, लॉकडाऊनचा परिणाम आणि लोकांची कोविडबाबतची शिस्त या तीन गोष्टींनी या काळात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दुसरी लाट ही कायम धोकादायक असते. त्यामुळे हा ट्रेंड जास्त कालावधीपर्यंत राहू शकतो. यातून संपूर्णपणे बाहेर येण्यासही जास्त कालावधी लागेल. पण अनलॉक करण्याआधी लसीकरणाचा वेग आणि डबल मास्किंग करणे गरजेचे आहे. पण जर लोकांनी पुन्हा बेफिकीरी दाखवली तर तिसरी लाट येऊन त्यातून सावरणे कठीण होईल.
डॉ. शशांक जोशी, सदस्य , राज्य टास्क फोर्स
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांचा आकडाही झपाट्याने खाली आला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत दिवसाला 10 ते 11 हजाराच्या पटीत नवे कोरोना रुग्ण आढळत होते. पण गेल्या 15 दिवसांत यामध्ये टप्प्याटप्प्याने घट होत हा आकडा आता 4 हजारांच्याही खाली गेला आहे. त्यानुसार या एका महिन्यात मुंबईचा कोरोना दुप्पट होण्याचा 96 दिवसांवर पोहोचला आहे जो 15 दिवसांपूर्वी 42 दिवसांवर होता.
1 एप्रिल - 49 दिवस
15 एप्रिल - 42 दिवस
22 एप्रिल - 50 दिवस
23 एप्रिल - 52 दिवस
24 एप्रिल - 54 दिवस
25 एप्रिल -58 दिवस
26 एप्रिल - 62 दिवस
29 एप्रिल - 79 दिवस
30 एप्रिल - 87 दिवस
1 मे - 96 दिवस
दरम्यान 30 एप्रिल आणि 1 मे दोन दिवसांत मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर सरासरी 8 दिवसांनी वाढला असल्याचे पालिकेच्या आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे.
(संपादन- पूजा विचारे)
mumbai corona patient doubled rate from 49 to 96 days in month
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.