मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोविड रुग्णांची संख्या कमी झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे, 'जंबो फॅसिलिटी' अर्थात अधिक क्षमतेच्या उपचार केंद्रांमध्ये गेल्या दोन आठवड्यापासून रुग्णांची गर्दी नियंत्रणात आली आहे.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुंबई आणि परिसरात मोकळ्या मैदानांवर आधुनिक उपचार सुविधांयुक्त रुग्णालयांची निर्मिती केली आहे. ऑक्सिजन तसेच आयसीयू देखील उभारले आहेत. त्यानुसार, बीकेसी, गोरेगाव नेस्को आणि वरळी एनएससीआय डोममधील रुग्णांचा भार हलका झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, कोविड सेंटरमधील रुग्णसंख्येत 50 टक्क्यांनी घट झाल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (आरोग्य) सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे.
सुरूवातीच्या काळात मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळले. त्यातून अनेकांनी आपला जीव गमावला. त्यावेळेस रुग्णांना बेड्स उपलब्ध होत नसल्याच्या अनेक तक्रारी देखील येत होत्या. मात्र, आता रुग्णाला सहज बेड उपलब्ध होत असल्याचे कोविड केंद्रातून सांगण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात 824 रुग्णांची नोंद झाली होती. पण, आता 720 ते 730 एवढ्या रुग्णांची नोंद केली जात आहे. म्हणजेच 100 च्या संख्येने रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. आयसीसू पूर्णपणे भरलेले आहे. शिवाय, इतर ठिकाणांहून आयसीयूसाठी विचारणा केली जात आहे. मात्र, वॉर्डमध्ये रुग्ण येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या आठवड्यात प्रत्येक दिवशी 100 ते 125 नवीन रुग्ण दाखल होत होते. मात्र, आता गेले 3 दिवसात 70 ते 80 रुग्ण येत आहेत. रविवारी एकूण 74 नवीन रुग्ण दाखल झाले. म्हणजेच जवळपास 50 ते 60 टक्क्यांनी दररोजच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. मध्यंतरी 49 मेट्रो वर्कर्स पॉझिटिव्ह आल्याने एकाच वेळी येथील रुग्णसंखा वाढली. सद्यस्थितीत 60 आयसीयू बेड्स आहेत जे पूर्णपणे भरलेले आहेत. ज्यातील 12 बेड्स संशयित रुग्णांसाठी आहेत. त्यातील 2 बेड्स भरलेले आहेत बाकी बेड्स रिक्त असल्याची माहिती गोरेगाव नेस्को कोविड केंद्राच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले आहे.
बीकेसी येथे असणाऱ्या जंम्बो कोविड केंद्रात सध्या रुग्णांची वाढती संख्या आहे. कारण, येथे असलेल्या सुविधांमुळे फक्त मुंबईतीलच नाही तर राज्यातून ही रुग्ण दाखल होत आहेत. सध्या येथे 2000 खाटांपैकी 460 ऑक्सिजन बेड्स, 430 ऑक्सिजन नसलेले म्हणजेच जवळपास 800 बेड्स रिक्त आहेत. तर, आता सद्यस्थितीत 1200 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आयसीयूचे 108 बेड्स असून 82 रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून 16 बेड्स रिक्त आहेत. दरम्यान, सर्वच्या सर्व व्हेंटिलेटर फुल्ल आहेत ज्याची क्षमता फक्त 42 आहे. बाकी बायपॅपची सुविधाही आहे.
गेल्या आठ ते दहा दिवसात रुग्णांचा भार नक्कीच हलका झाला आहे. बेड्स रिक्त आहेत पण, व्हेंटिलेटर सोबत असणारे बेड्स भरलेले आहेत. व्हेंटिलेटरची गरज आहे. ऑक्सिजन आणि ऑक्सिजन नसलेले बेड्स बऱ्यापैकी रिक्त आहेत. म्हणजेच गेल्या काही दिवसांत 10 टक्के रुग्णांची संख्या कमी झाली आहे. बीकेसीमध्ये चांगल्या सुविधा मिळत असल्याने 35 टक्के रुग्ण मुंबई बाहेरील आहेत. म्हणजेच राज्यातूनही रुग्ण येथे दाखल होत आहेत. सोलापूर, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, पिंपरी-चिंचवड येथून रुग्ण येत आहेत. दरम्यान, आतापर्यंत 10 हजार रुग्णांवर उपचार केले गेले आहेत.
डॉ. राजेश ढेरे, संचालक, बीकेसी कोविड केंद्र
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जंम्बो कोरोना केअर सेंटर, समन्वयासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये वॉर रुमच्या मदतीमुळे रुग्णांच्या तब्येतीनुसार त्यांना हलवले जाते याच कारणामुळे बेड्ससाठी होणारी समस्या आता आटोक्यात येत आहे. याआधी रुग्णांना आयसीयू बेड्ससाठी रुग्णांलयांमध्ये फेऱ्या किंवा सतत विचारपूस करावी लागत होती. मात्र, आता ही परिस्थिती नियंत्रणात आली आहे. या कोविड केंद्रात सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. आयसीयू, बेड्स, रुग्णांचे समुपदेशन, फिजिओथेरेपी अश्या सुविधांमुळे रुग्णांवर सकारात्मक बदल जाणवत आहे.
--------------------------
(संपादनः पूजा विचारे)
Mumbai Corona slowly retreated 50 percent reduction number patients Covid Center
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.