मुंबई- जोगेश्वरी परिसरात एकावर गंभीर हल्ला करून गेल्या 35 वर्षांपासून पोलिसाना गुंगारा देणाऱ्या आरोपीला पोलिसानी गजाआड केले आहे. चिंकू प्रसाद ऊर्फ पेटबली यादव असे आरोपीचे नाव असून 35 वर्षांनंतर अखेर जोगेश्वरी पोलिसांना त्याला पकडण्यात यश आले आहे. कोणतेही छायाचित्र अथवा महत्त्वपूर्ण माहिती नसताना जोगेश्वरी पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला सापळा रचून अटक केली.
35 वर्ष फरार
जोगेश्वरी परिसरात 1989 मध्ये एकाला गंभीर दुखापत केल्याप्रकरणी पेटबलीला अटक झाली होती. त्याप्रकरणी 20 दिवस न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर आरोपी पेटबली बाहेर आला. त्यानंतर तो न्यायालयापुढे हजरच झाला नाही.
त्यामुळे न्यायालयाने त्याला फरार घोषीत केले. आरोपी केवळ जोगेश्वरीतील एका रेतीच्या दुकानात काम करत असल्याची माहिती पोलिसांकडे होती. पण त्याचे छायाचित्र पोलिसांकडे उपलब्ध नव्हते. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करून आरोपीचा शोध घेण्यात आला. परंतु आरोपी 35 वर्ष पोलिसांच्या रडारवर येण्यापासून स्वतःला वाचवत राहिला.
पेटबली म्हणून प्रसिद्ध
काही दिवसांपूर्वी आरोपी उत्तर प्रदेशातील त्याच्या गावी गेल्याचे पथकाला माहिती मिळाली. पोलिसांनी अजून माहिती घेतली असता चिंकू प्रसाद नावाने त्याला कोणी ओळखत नसल्याचे, तसेच त्याचे पोट मोठे असल्यामुळे लहानपणापासूनच तो पेटबली नावाने प्रचलित असल्याचे पोलिसांना समजले.
पेटबली नावाच्या व्यक्तीची पोलिसांनी चौकशी केली असता अशाच वर्णनाची एक व्यक्ती जोगेश्वरी परिसरातील वेल्डिंगच्या दुकानात कामाला असल्याचे पोलीस पथकाला समजले. पण आरोपी त्यावेळी गावी गेला होता.
तो आल्यावर पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला पकडले. त्याची चौकशी केली असता आपणच चिंकू प्रसाद असल्याचे त्याने मान्य केले. तसेच गंभीर दुखापतीचा गुन्हा केल्याचेही सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पेटबली उत्तर प्रदेशातील बलरामपूरमधील तुलसीपूर येथील रहिवासी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.